HCAH आणि QMS एकत्र: रुग्ण सहाय्य सेवेचे देशातील सर्वात मोठे व्यासपीठ उभारणार
घरपोच आरोग्यसेवा देणारी हेल्थ केअर ॲट होम इंडिया आणि क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस यांनी रुग्ण सहाय्य सेवांसाठी भागीदारी जाहीर केली आहे.
घरपोच आरोग्यसेवा क्षेत्रातील हेल्थ केअर ॲट होम इंडिया प्रा. लि. (HCAH) आणि क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड (QMS) यांनी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. क्यूएमएस ही एकात्मिक आरोग्यसेवा क्षेत्रातली कंपनी असून ती राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मुख्य फलकावर नोंदणीकृत आहे. औषधनिर्मिती कंपन्यांसाठीच्या रुग्ण सहाय्य सेवा अधिक व्यापक करणे, हा या भागीदारीचा उद्देश आहे.
या भागीदारीनुसार दोन्ही कंपन्यांचे रुग्ण सहाय्य सेवा व्यवसाय क्यूएमएसची शंभर टक्के मालकी असलेल्या सारथी हेल्थकेअर या उपकंपनीत विलीन केले जाणार आहेत. या विलीनीकरणातून भारतातील सर्वात मोठे रुग्ण सहाय्य सेवा व्यासपीठ उभे करण्याचे उद्दिष्ट आहे.
या एकत्रित व्यासपीठावरून १६० हून अधिक रुग्ण सहाय्य कार्यक्रमांतून १२ लाखांहून अधिक रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. ३५ हून अधिक शहरांत २ हजारांपेक्षा अधिक आरोग्यसेवा व्यावसायिकांचे जाळे काम करत राहणार आहे. रुग्णांची तपासणी, नोंदणी, उपचाराची सुरुवात, उपचारातील सातत्य, आर्थिक व वैद्यकीय मदत आणि रोग व्यवस्थापन अशा अनेक पातळ्यांवर या सेवा वाढवल्या जाणार आहेत.
देशातील प्रमुख भारतीय तसेच बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती कंपन्यांना या व्यासपीठावरून सेवा दिल्या जाणार आहेत. सध्याचे ग्राहक, सेवा कार्यक्रम आणि कर्मचारी यांचे सातत्य कायम ठेवून अधिक व्यापक व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश माखिजा म्हणाले, "या भागीदारीमुळे रुग्ण सहाय्य आणि रुग्णांशी सातत्यपूर्ण संपर्काच्या क्षेत्रातील दोन पूरक सेवा व्यवस्था एकत्र येत आहेत. या क्षमतांचा एकत्रित वापर करून औषधनिर्मिती कंपन्यांना अधिक व्यापक सेवा आणि मोठ्या प्रमाणावर पोहोच उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत अधिकाधिक रुग्णांना आवश्यक सहाय्य मिळावे, यासाठीही या भागीदारीचा उपयोग होईल. यामुळे क्यूएमएसच्या भागधारकांसाठी मूल्यनिर्मितीलाही चालना मिळेल."
एचसीएएचचे संचालक आणि डाबर इंडिया लिमिटेडचे संचालक आदित्य बर्मन म्हणाले, "विशेषतः दीर्घकालीन आजारांच्या उपचारांमध्ये केवळ उपचार सुरू करणे पुरेसे नसून त्यानंतरही रुग्णांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि मार्गदर्शन आवश्यक असते. एचसीएएच आणि क्यूएमएसच्या क्षमतांचे एकत्रीकरण झाल्यामुळे रुग्ण तसेच औषधनिर्मिती क्षेत्रातील भागीदारांना उपचाराच्या संपूर्ण कालावधीत सहाय्य देण्यासाठी व्यापक पोहोच, तंत्रज्ञान आणि प्रभावी अंमलबजावणीची क्षमता उपलब्ध होईल."
या भागीदारीमुळे आरोग्य व जनजागृती शिबिरे, विविध आजारांची तपासणी, रुग्ण नोंदणी, रोग व्यवस्थापन, उपचाराची सुरुवात, उपचारातील सातत्य, रुग्ण सहाय्य आणि रुग्णांशी सातत्यपूर्ण संपर्क या क्षेत्रांतला अनुभव एकत्र येणार आहे. त्यामुळे रुग्णाची ओळख पटवण्यापासून उपचारातील सातत्य राखण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात औषधनिर्मिती कंपन्यांना अधिक व्यापक सहाय्य देता येईल.
जागतिक रुग्ण सहाय्य सेवा क्षेत्राची बाजारपेठ सुमारे ७० अब्ज अमेरिकी डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे. भारतातील या क्षेत्राची बाजारपेठ दरवर्षी १५ ते २० टक्के दराने वाढत असून २०३० पर्यंत ती सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील जाहिरात व प्रचारावरील वाढते नियमन, या क्षेत्रातील वाढते औपचारिकीकरण, दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्यावरचा वाढता भर यामुळे या क्षेत्राच्या वाढीला चालना मिळत आहे.
क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड ही आरोग्यसेवा उत्पादने आणि सेवांच्या क्षेत्रात काम करणारी एकात्मिक आरोग्यसेवा कंपनी आहे. रुग्णांशी संपर्क व संवाद, रुग्ण सेवा कार्यक्रम, रोग व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपक्रम, रुग्ण तपासणी व वैद्यकीय शिबिरे, आरोग्यसेवा मनुष्यबळ तसेच वैद्यकीय आणि निदानविषयक सेवा अशा अनेक क्षेत्रांत कंपनी काम करते.
एकात्मिक आरोग्यसेवा पद्धतीतून क्यूएमएस औषधनिर्मिती कंपन्या, आरोग्यसेवा पुरवठादार आणि रुग्णांना सेवा देते. रुग्णांना आवश्यक उपचार मिळवून देणे, उपचारातील सातत्य राखणे आणि आरोग्यविषयक परिणाम अधिक प्रभावी करणे यावर कंपनीचा भर आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञता, डिजिटल तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर सेवा देण्याची क्षमता यांच्या आधारे क्यूएमएस या क्षेत्रातील आपली भूमिका अधिक मजबूत करत आहे.