जागतिक हृदयदिन: गोल्डन अवरमध्ये स्टेमी ठरतोय संजीवनी, ५७ लाख ईसीजींमध्ये ३४ हजार रुग्ण 'स्टेमी क्रिटिकल'
राज्यात राबवल्या जाणाऱ्या 'स्टेमी महाराष्ट्र' प्रकल्पातून गावपातळीवरील आरोग्यसंस्थेपासून अँजिओप्लास्टीपर्यंत उपचारांची साखळी उभी राहिली आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा प्रत्येक क्षण रुग्णासाठी निर्णायक असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद झाली आणि वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर हृदयाच्या स्नायूंचे नुकसान वाढत जाते. अशा 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णाला लगेच निदान आणि उपचार मिळावेत, यासाठी राज्यात 'स्टेमी महाराष्ट्र' प्रकल्प राबवला जात आहे. आज २९ सप्टेंबर, म्हणजे जागतिक हृदयदिनी हा प्रकल्प अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गावपातळीवरील आरोग्यसंस्थेपासून थेट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीच्या सुविधेपर्यंत उपचारांची साखळी या प्रकल्पातून उभी करण्यात आली आहे. म्हणजेच गावातल्या रुग्णालाही मोठ्या रुग्णालयातल्या उपचारांपर्यंत पोहोचता यावे, अशी ही रचना आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, प्रकल्पांतर्गत २०२०-२१ ते २७ सप्टेंबर २०२६ या काळात तब्बल ५७ लाख ९० हजार ९६३ ईसीजी काढण्यात आले. त्यापैकी ३४ हजार ३२ रुग्ण स्टेमी क्रिटिकल निघाले, तर १ लाख ४५ हजार ५०३ रुग्ण इतर क्रिटिकल आढळले. म्हणजे काढलेल्या प्रत्येक १०० ईसीजींमागे साधारण ३ रुग्ण क्रिटिकल श्रेणीत आढळले आणि त्यातले सुमारे ०.५९ टक्के रुग्ण स्टेमी क्रिटिकल होते.
स्टेमी म्हणजे 'एसटी-इलेव्हेशन मयोकार्डियल इन्फावर्शन'. हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाली आणि रक्तपुरवठा अचानक बंद पडला, की हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. म्हणूनच ईसीजीवरून स्टेमीचे निदान शक्य तितक्या लवकर होणे आणि त्यानंतर बंद रक्तवाहिनी खुली करण्यासाठी अँजिओप्लास्टीसारखा उपचार वेळेत मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. उपचारांची हीच साखळी मजबूत करण्याचे काम स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पातून केले जात आहे.
राज्यातील २,४१५ 'स्पोक' आरोग्यसंस्था आणि ९६ 'हब' यांच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राथमिक आरोग्यसंस्थेत ईसीजी काढून त्याचे लगेच मूल्यांकन केले जाते. रुग्ण 'स्टेमी क्रिटिकल' असल्याचे निदान झाले, तर पुढच्या उपचारांसाठी त्याला हब रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामुळे निदानापासून रक्तवाहिनी खुली करण्याच्या उपचारापर्यंतचा मौल्यवान वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
८८ स्टेमी प्रकल्प अत्यंत उपयुक्त असून, हृदयविकाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे, अशी माहिती संजय काटकर यांनी दिली. प्रकल्पातील उपलब्ध मनुष्यबळाचे मॅपिंग सुरू आहे, तसेच उपलब्ध स्टाफच्या क्षमतेनुसार त्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.