ग्वाल्हेर अपघातात 17 जणांचा बळी; Google Maps च्या मार्गावर पुन्हा प्रश्नचिन्ह
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील भीषण अपघातानंतर नेव्हिगेशन ॲपवरील मार्गांच्या विश्वासार्हतेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अपघाताला फक्त Google Maps जबाबदार असल्याचे अद्याप निश्चित झालेले नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर Google Maps वर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ग्वाल्हेरचे सीएसपी रवी भदौरिया यांनी प्राथमिक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतमाल घेऊन निघालेले ट्रक डबरा मंडीतून येत होते. ट्रकचालक या भागातला नसल्यामुळे त्याने Google Maps वरून रस्ता शोधला असावा आणि कमी अंतराचा मार्ग निवडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंदिराजवळच्या घाटाच्या परिसरात आल्यावर ट्रकच्या प्रेशर रिलीज यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे ब्रेक निकामी झाले आणि ट्रक गर्दी असलेल्या ठिकाणी घुसला, त्यातून हा मोठा अपघात झाला.
मात्र या दुर्घटनेला फक्त Google Maps जबाबदार होते, हे अजून निश्चित झालेले नाही. अपघाताचे नेमके कारण काय, गाडीत तांत्रिक बिघाड कसा झाला आणि चुकीच्या मार्गाचा त्यात किती वाटा होता, याची चौकशी करूनच जबाबदारी ठरवायला हवी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आपल्याला एखाद्या ठिकाणाचा पत्ता माहीत नसला की आपण हमखास Google Maps उघडतो. शॉर्टकट मारण्याच्या नादात अनेकजण 'गूगल बाबा'वर विश्वास ठेवून 100 ते 150 च्या वेगाने गाडी पळवतात. पण हाच विश्वास अनेकदा जीवघेणा ठरला आहे, असे या निमित्ताने समोर आले आहे.
देशात महामार्ग, एक्स्प्रेस वे आणि पुलांचे जाळे झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, काही पूल अपूर्ण आहेत आणि काही मार्गांवर वाहतुकीला बंदी आहे. अशा वेळी डिजिटल नकाशावर दिसणारी माहिती आणि प्रत्यक्षातली रस्त्याची स्थिती यात फरक असल्याचे वारंवार दिसले आहे. चुकीचे मार्ग, अपूर्ण पूल आणि बंदी असलेल्या रस्त्यांवरून गाड्या गेल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
याचा सर्वाधिक त्रास अवजड वाहनांना होऊ शकतो. अरुंद रस्त्यावरून किंवा तीव्र उताराच्या मार्गावरून जावे लागले, तर धोका आणखी वाढतो. म्हणूनच नेव्हिगेशन ॲपमधली माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवणे जसे गरजेचे आहे, तसेच रस्त्यावरच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.
Google Maps वापरताना चालकांनी फक्त स्क्रीनवरच्या मार्गावर अवलंबून राहू नये. रस्त्यावरचे दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांना प्राधान्य द्यावे. अवजड वाहनांच्या चालकांनी गाडीचा आकार, वजन आणि रस्त्याची क्षमता लक्षात घेऊनच मार्ग निवडावा, असे सांगण्यात आले आहे.
नेव्हिगेशन कंपन्या, रस्ते बांधकाम विभाग आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून बंद किंवा धोकादायक मार्गांची माहिती वेळेवर अद्ययावत करणे गरजेचे आहे. ग्वाल्हेरच्या दुर्घटनेतून तंत्रज्ञानावर आंधळेपणाने अवलंबून राहण्याचा धोका स्पष्ट दिसतो. शॉर्टकटऐवजी सुरक्षित प्रवासाचा मार्ग निवडला असता, तर आज अनेकांचे प्राण वाचले असते.