रेल्वेत मोबाईल स्पीकरवर गाणी लावल्यास कारवाई, 5,000 रुपयांपर्यंत दंड आणि 6 महिने शिक्षा
रेल्वे स्थानकात किंवा ट्रेनमध्ये मोबाईल स्पीकरवर गाणी, व्हिडिओ लावून किंवा मोठ्याने बोलून सहप्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रेल्वे परिसरात किंवा चालत्या ट्रेनमध्ये मोबाईल लाऊडस्पीकरवर लावून गाणी ऐकणाऱ्या, व्हिडिओ पाहणाऱ्या किंवा मोठ्या आवाजात बोलणाऱ्या प्रवाशांवर आता कायदेशीर कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी इतरांचा विचार न करता असे करणे अनेकांची सवयच झाली आहे. पण त्यामुळे सहप्रवाशांना नकोसा त्रास होतो, याची गंभीर दखल भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.
मोबाईल इंटरनेटचा वापर खूप वाढल्यामुळे ट्रेनमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी स्पीकरवर व्हिडिओ किंवा गाणी वाजवणारे अनेकजण दिसतात. त्यामुळे इतर प्रवाशांच्या आरामावर आणि प्रवासाच्या आनंदावर वाईट परिणाम होतो. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेच्या मुख्यालयाने अलीकडेच सर्व विभागांना एक परिपत्रक जारी केले आहे. रेल्वे स्थानके किंवा ट्रेनमध्ये प्रवासी मोबाईलवर स्पीकर सुरू करून ऑडिओ किंवा संगीत ऐकत आहेत आणि त्यामुळे इतर प्रवाशांच्या सुखकर प्रवासात अडथळा येत आहे, असे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
जन विश्वास (सुधारणा तरतुदी) कायद्यानुसार सुधारित झालेल्या 'रेल्वे कायदा, 1989' मधील कलम 145 (2) (ए) चा आधार घेऊन रेल्वे प्रशासनाने हे नवे नियम लागू करायला सुरुवात केली आहे. या नियमानुसार कोणी सार्वजनिक ठिकाणी किंवा ट्रेनमध्ये मोबाईलवर लाऊडस्पीकर लावून किंवा मोठ्याने बोलून सहप्रवाशांना त्रास किंवा न्यूसन्स (Nuisance) देत असेल, तर त्याला रेल्वे परिसरातून थेट बाहेर काढले जाऊ शकते. शिवाय त्याच्यावर 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
एवढेच नव्हे, तर रेल्वेच्या अधिकृत अधिकाऱ्याने ताकीद दिल्यानंतरही त्या व्यक्तीने त्रास देणे सुरूच ठेवले, तर त्याला 6 महिने साधी शिक्षा, 5,000 रुपयांपर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांमध्ये या नियमाची जाणीव निर्माण व्हावी म्हणून सर्व विभागांनी नियमितपणे सार्वजनिक घोषणा कराव्यात, असे निर्देश रेल्वे मुख्यालयाने दिले आहेत. तिकीट परीक्षक (TTE) किंवा त्यापेक्षा वरच्या पदावरील व्यावसायिक कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यात खासदार तेजस्वी सूर्य यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका 'शिवश्री स्कंदप्रसाद' यांनी सोशल मीडियावर प्रवासातील आपला वाईट अनुभव मांडला होता. एसी टू-टियर डब्यातील 56 आसनांच्या कोचमध्ये सुमारे 40 प्रवाशांचा एक गट खूप मोठ्या आवाजात गप्पा मारत होता आणि त्यामुळे त्यांना मोठा त्रास झाला. त्यांनी टीटीईकडे दुसरा बर्थ मागितला, पण तो मिळू शकला नाही.
त्याच वेळी 8 जणांच्या दुसऱ्या एका गटाने 'युनो' (Uno) खेळायला सुरुवात केली होती, पण टीटीईने सांगितल्यानंतर त्यांनी खेळ थांबवला. या घटनेनंतर स्कंदप्रसाद यांनी खंत व्यक्त करत म्हटले होते, "एक देश म्हणून आपण आपल्या सार्वजनिक वर्तनात कधी सुधारणा करणार?" या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची शिस्त आणि सुरक्षा यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलले आहे.