सुनीता आहुजांच्या व्हायरल व्हिडिओनंतर कोमल राणीचे थेट प्रत्युत्तर
गोविंदा आणि कोमल राणीच्या कथित अफेअरची चर्चा पुन्हा सुरू झाली असून सुनीता आहुजांच्या वक्तव्यावर कोमलने सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले आहे.
बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून सिनेमापेक्षा घरातल्या भांडणामुळेच जास्त चर्चेत आहे. त्याची बायको सुनीता आहुजा वारंवार आरोप करत आली आहे की गोविंदाचे बाहेर अफेअर चालू आहे. एका मुलाखतीत सुनीता आहुजा म्हणाली होती की ती आणि गोविंदा अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. या बोलण्यात सुनीता अनेकदा कोमल राणीचे नाव घेत होती.
गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल अनेकदा एअरपोर्टवर एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघेही लालबागच्या राजाच्या दर्शनाला एकत्र गेले होते, आणि तेव्हापासूनच या चर्चेला जोर आला.
काल सुनीता आहुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत ती गोविंदा आणि कोमलच्या लालबागच्या फोटोवर बोलताना दिसली. ती म्हणाली, "माझं घर विनाकारण कोसळत आहे." यातून तिला असे सुचवायचे होते की कोमलमुळे तिचे घर मोडत आहे. यावर कोमल राणीने पहिल्यांदाच मौन सोडत सुनीताला थेट उत्तर दिले आहे.
कोमलने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट टाकली. त्यात तिने लिहिले, "जे घर आधीच मोडकळीस आलेलं आहे, ते कोणीही तोडू शकत नाही." इतकंच नाही तर तिने आणखी एक धक्कादायक आरोपही केला. ती म्हणते, "जी बाई अनेक वर्षांपासून स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतेय, तिच्या शापाकडे कोणी लक्ष देत नाही."
कोमलने पुढे लिहिले, "आपल्या देशातले लोक इतके मूर्ख नाहीत की कोणी सांगितलं म्हणून कावळ्याच्या मागे पळत सुटतील. एक बाई इतका त्रास सहन करतेय हे मला समजत नाही. पण त्रास कमी करण्याऐवजी तो सगळ्या जगाला दाखवण्यात काय मजा येते? हे खरंच दुःख आहे की मुद्दाम रचलेला प्लॅन आहे, हेच कळत नाही."
कोमल इथेच थांबली नाही. तिने नाव न घेता सुनीतावर थेट निशाणा साधला. ती लिहिते, "एका माणसाचा मानसिक छळ करणं, त्याला काम करू न देणं, त्याला घरात एकटं बसवून ठेवणं आणि मरणाच्या दारात ढकलणं, कोणतीही चांगली बायको आपल्या नवऱ्यासोबत असं वागेल असं मला वाटत नाही." असे गंभीर आरोप कोमलने सुनीतावर केले आहेत.
शेवटी तिने सवाल उपस्थित केला, "अशा बायका मनोरुग्ण असतात की जास्तच हुशार असतात? कारण त्यांना माहित असतं की बंद दाराआड जे साधता आलं नाही, ते लोकांसमोर रडून सहानुभूती मिळवून साधता येतं. तुमचा अजेंडा चालवण्यासाठी माझं नाव वापरणं बंद करा. देव प्रत्येक चांगल्या माणसाला अशा धूर्त बायकांपासून वाचवो."
हे संपूर्ण प्रकरण दोघे एअरपोर्टवर एकत्र दिसले तेव्हापासून सुरू झाले होते. दोनवेळा ते एकत्र स्पॉट झाले आणि दोघांनी फोटोही दिले. त्यानंतर लालबागला एकत्र गेल्यावर चर्चेने आणखी जोर धरला.
यावर गोविंदाने सांगितले होते, "माझं कोमलसोबत अफेअर असलं तरी हा काही पब्लिक इश्यू नाही. मी काम करतोय, माझे प्रोफेशनल संबंध आहेत. लोकांना वाटतंय मी काम करू शकणार नाही. मला फायनान्सर मिळू नये यासाठी मला धमक्या येत आहेत. सगळे माझ्याविरोधात प्लॅन करत आहेत."
गोविंदा आणि कोमल लवकरच 'रूपा' नावाच्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे हे अफेअर आहे की केवळ सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र कोमलने जे लिहिले आहे त्यामुळे हे भांडण आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.