मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:03 IST

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यासाठी संजय गांधी उद्यानाखाली बोगदा खोदकामाला वेग

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली भूमिगत बोगदे खणण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यासाठी संजय गांधी उद्यानाखाली बोगदा खोदकामाला वेग
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी हाती घेतलेल्या गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्पातील भूमिगत बोगदा खोदकामाच्या कामाने आता चांगलाच वेग पकडला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणा-या जुळ्या बोगद्यांचे बांधकाम 'तुळशी' आणि 'विहार' या दोन अवाढव्य टनेल बोरिंग मशिनच्या (TBM) मदतीने युद्धपातळीवर सुरू आहे.

हा प्रकल्प GMLR टप्पा 3 (ब) अंतर्गत राबवला जात असून, गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून टनेल बोरिंग मशीनद्वारे 5.30 किलोमीटर लांबीचे दुहेरी बोगदे बांधले जात आहेत. प्रत्येक बोगद्याला तीन मार्गिका असतील. यापैकी 'तुळशी' हे पहिले बोगदा खणन संयंत्र 17 ऑगस्ट 2026 रोजी कार्यान्वित करण्यात आले. आतापर्यंत या संयंत्राने 64 मीटर खोदकाम पूर्ण केले आहे, तर दुसरे संयंत्र 'विहार' याचे सुटे भाग जोडण्याचे काम 92 टक्के पूर्ण झाले आहे.

'तुळशी' संयंत्राद्वारे बोगद्याचे खोदकाम सातत्याने सुरू असून, बोगद्याच्या बांधणीतील महत्त्वाचा घटक असलेली कंकणाकृती कडे उभारण्याचे कामही वेगात सुरू आहे. 64 मीटरच्या खोदकामादरम्यान 27 कायमस्वरूपी कंकणाकृती कडा आणि 2 तात्पुरत्या स्वरूपाच्या कंकणाकृती कडांची उभारणी 'तुळशी'च्या मदतीने करण्यात आली आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडमधील खिंडीपाडा या दरम्यान हे जुळे व भूमिगत बोगदे बांधले जात असून, एकमेकांना समांतर असलेल्या या बोगद्यांची लांबी प्रत्येकी 4.70 किलोमीटर आहे. या समांतर बोगद्यांचा व्यास सर्वसाधारणपणे 14.20 मीटर असून, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात मात्र तो 13 मीटर इतका आहे.

'तुळशी' हे बोगदा खनन संयंत्र सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) हार्ड रॉक प्रकारातील असून, त्याच्या कापणी यंत्राचा (Cutter) व्यास 14.49 मीटर आणि एकूण लांबी 83 मीटर इतकी आहे. यामध्ये 22 मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि 61 मीटर लांबीची तीन मजली बॅक अप गॅन्ट्री यांचा समावेश आहे. या संयंत्रात पूर्णपणे स्वयंचलित मलबा (Muck) हाताळणी प्रणाली बसवण्यात आली असून, त्यात 340 मीटर लांबीची कन्व्हेयर प्रणाली, क्रॉस कन्व्हेयर आणि स्टॅकर कन्व्हेयर यांचा समावेश आहे. यामुळे आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीतही मलब्याची वाहतूक कार्यक्षमपणे होते आणि काम अधिक सुरक्षित व उत्पादनक्षम होते.

'तुळशी' संयंत्राच्या मदतीने एका बोगद्याचे खोदकाम सुरू असतानाच, दुसरे संयंत्र 'विहार' याचे सुटे भाग जोडण्याचे कामही 92 टक्के पूर्ण झाले आहे. संपूर्ण यंत्रणा प्रकल्पस्थळी उभी केल्यानंतर तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणाली एकत्रितपणे नीट काम करत आहेत की नाही, याची पडताळणी करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2026 पासून प्रकल्पस्थळ स्वीकृती चाचणी (Site Acceptance Test - SAT) सुरू करण्यात येणार आहे. सर्व तांत्रिक चाचण्या ठरलेल्या निकषांनुसार पूर्ण झाल्यानंतर 22 ऑक्टोबर 2026 पासून दुस-या बोगद्याच्या प्रत्यक्ष खोदकामाला सुरूवात केली जाणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ