गोंदियात नऊ वर्षांच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील उमेश रामटेके याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत दोषी ठरवले. एका प्रकरणात जन्मठेप, तर दुसऱ्यात सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
गोंदिया, ता. २३ : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे राहणाऱ्या उमेश राजू रामटेके (वय ३६) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत दोषी ठरवले. दोन्ही प्रकरणांचा निकाल शुक्रवारी (ता. २३) लागला. एका प्रकरणात त्याला जन्मठेप झाली, तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि धमकी दिल्याबद्दल वेगवेगळ्या कलमांखाली दोन ते पाच वर्षांपर्यंत सश्रम कारावास सुनावण्यात आला.
पहिला गुन्हा केशोरी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत दाखल झाला होता. आरोपीने स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप होता. शिवाय त्याने आपल्या आईवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि तिला व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असाही आरोप या प्रकरणात होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सतीश घोडे आणि चुटे यांनी न्यायालयात बाजू मांडली. सुनावणी झाल्यावर न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ) खाली १५ वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला. पोक्सो कायद्याच्या कलम ६ खाली जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड झाला. बीएनएस कलम ३५१(३) खाली पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा झाली.
दुसरा गुन्हा केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३/२०२४ नुसार भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झाला होता. १२ एप्रिल २०२४ रोजी रात्री प्रतापगड येथे १७ वर्षे पाच महिने वयाची मुलगी घरी झोपली होती. त्या वेळी आरोपी घरात अनधिकृतपणे घुसला, असा आरोप होता. त्याने तिच्याशी गैरवर्तन केले, शारीरिक सुखाची मागणी केली आणि तिचा हात पकडून विनयभंग केला, असे या प्रकरणात म्हटले होते.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जोगदंड यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सतीश घोडे आणि चुटे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ४५० खाली पाच वर्षे सश्रम कारावास सुनावला. कलम ३५४ आणि ५०६ खाली प्रत्येकी तीन वर्षे, पोक्सो कायद्याच्या कलम ८ खाली तीन वर्षे आणि कलम १२ खाली दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली. या प्रकरणातही वेगवेगळ्या कलमांनुसार कारावास आणि दंड ठोठावण्यात आला.
दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात केशोरी पोलीस ठाण्याच्या पथकाची महत्त्वाची भूमिका राहिली. न्यायालयातील कामकाजासाठी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस शिपाई पुनम ठाकरे यांनी काम पाहिले.
या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे आणि केशोरीचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन ढेकणे यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.