गोंदियात दतोरा येथे ग्रामपंचायत अधिकारी युनियनने बांधला वनराई बंधारा
ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा गोंदिया आणि ग्रामपंचायत दतोरा यांनी मिळून दतोरा येथे वनराई बंधारा उभारला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गोंदिया, दि. १६: पाण्याचे संवर्धन व्हावे, भूजलपातळी वाढावी आणि पुढे येणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने दतोरा येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा गोंदिया आणि ग्रामपंचायत दतोरा यांनी संयुक्तपणे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन हा महत्त्वाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
या उपक्रमात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फणिंद्र कुत्तीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार कटरे (महिला बालकल्याण) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे (पाणीपुरवठा व स्वच्छता) सहभागी झाले. ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन आणि इतर अधिकारी-कर्मचारीही मोठ्या संख्येने हजर होते.
तानाजी लोखंडे म्हणाले, "पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग करणे ही काळाची गरज बनली आहे." फणिंद्र कुत्तीरकर यांनी सांगितले, "लोकसहभातून जलसंधारणाची चळवळ उभी करून प्रत्येक गावाने पाणी संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे." मधुकर वासनिक यांच्या म्हणण्यानुसार, "भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलस्रोतांचे जतन अत्यंत आवश्यक आहे."
कीर्तीकुमार कटरे यांनी म्हटले, "पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी प्रत्येक गावाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे." विजय लोंढे म्हणाले, "शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर हाच महत्त्वाचा मार्ग आहे."
जलसंधारणाचे महत्त्व सांगताना कमलेश बिसेन म्हणाले, "ग्रामपंचायत अधिकारी हे केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित नसून ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत जलसंधारणासारखे लोकहिताचे उपक्रम राबविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे."
बिसेन यांनी पुढे सांगितले की, आपल्या पूर्वजांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तलाव बांधले आणि पाणी जमिनीत जिरवले. त्यामुळेच आज आपल्या जिल्ह्यात शंभर फुटांच्या आत मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र हे टिकवून ठेवले नाही, तर भविष्यात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. या वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवायला आणि जमिनीत मुरायला मोठी मदत होणार आहे.
या मोहिमेत वैशाली खोब्रागडे (सहायक गट विकास अधिकारी), कमलेश बिसेन (जिल्हाध्यक्ष), कुलदीप कापगते (सरचिटणीस), सुरेश निमजे, चुन्नीलाल गावलं, लक्ष्मीकांत चिंधालोरे (तिघेही विस्तार अधिकारी), मयंक माधवाणी (शाखा अभियंता), वाय. एच. बिसेन (ग्रामपंचायत अधिकारी), आर. आर. जमईवार (प्रसिद्धी प्रमुख), ओ. के. रहांगडाले (तालुकाध्यक्ष) आणि दीपक रेवतकर (सरचिटणीस) सहभागी झाले. त्यांच्यासह दुर्गा भोंगाने, दिव्यानी डोंगरे, एस. एस. रहांगडाले, पी. बी. गिरीपुंजे, एन. एच. येळे, कुणाल कोसरकर, कुणाल रहांगडाले, एच. बी. पटले, पराग हेमने, जी. एन. लिल्हारे, के. पी. उपवंशी, जी. आर. उके, आर. डी. मेश्राम, डी. एस. अग्रवाल, के. जी. ठाकरे, एस. आर. कोठेवार, वेदमूर्ती साकुरे, शिवानंद गौतम, आर. जी. चौधरी, पी. आर. चौधरी, राजरत्न मेश्राम, अविनाश रहांगडाले, सी. ए. रहांगडाले, योगराज फुंडे, गोरे, पांडुरंग हरीखेडे, संजय कडव आणि जितेन्द्र रामटेके हेही उपस्थित होते. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत अधिकारीही मोठ्या संख्येने आले होते.
ग्रामपंचायत अधिकारी युनियन गोंदिया आणि ग्रामपंचायत दतोरा यांच्या संयुक्त पुढाकारातून झालेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जलसुरक्षा यांचा चांगला संदेश देणारा ठरला आहे. अशा प्रेरणादायी उपक्रमांमुळे ग्रामीण भागात जलसंधारणाविषयी मोठी जागरूकता निर्माण होईल आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीला नक्कीच बळ मिळेल.