राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ऊसदराच्या मागणीसाठी आज किणी टोल नाक्यावर चक्काजाम करण्याचा निर्धार करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कोल्हापूर पोलिसांनी कलम १६८ अन्वये नोटीस बजावली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी शेट्टी यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली आहे. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऊसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा आणि दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी राजू शेट्टी यांची मागणी आहे. याच मागणीसाठी त्यांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
आज, मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाका येथे समर्थक आणि कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी ही नोटीस बजावली. रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी ही कारवाईची नोटीस प्रत्यक्ष लागू केली.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि ३७ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशांचा आधार घेऊन पोलिसांनी शेट्टी यांना ही नोटीस दिली आहे.
नोटिशीत आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडाव्यात, असेही पोलिसांनी बजावले आहे.
पोलिसांनी स्पष्ट इशाराही दिला आहे. आंदोलनादरम्यान शेट्टी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना सर्वस्वी जबाबदार धरले जाईल, तसेच ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल, असे यात म्हटले आहे.
पोलिसांची नोटीस बजावण्यात आल्यानंतरही राजू शेट्टी यांनी आंदोलन करण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे आज ३ नोव्हेंबर रोजी किणी टोल नाक्यावर नेमके काय घडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.