Instamart मोदक ऑर्डर्स: मुंबईकर मोदकाच्या प्रेमात, मिनिटाला 100 ऑर्डर्स; भायखळ्यातील ग्राहकाची 3.88 लाखांची
गणेशोत्सवात मुंबईकरांनी मोदक, फुलं आणि पूजासाहित्य यांच्या खरेदीत उत्साह दाखवला. Instamart वरील आकडेवारीनुसार भायखळ्यातील एका ग्राहकाने तब्बल 3.88 लाख रुपयांची खरेदी केली.
गणेशोत्सव आला की नुसता उत्सव नाही, तर घरोघरी गोडधोडाची चंगळही सुरु होते. यंदाही मुंबईकरांनी खरेदीत हाच अनुभव दाखवून दिला. मोदक, ताजी फुलं आणि पूजासाहित्य यांची मागणी यंदा विशेष उठून दिसली. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Instamart वरील 14 ते 23 सप्टेंबर या कालावधीतील ऑर्डर्सच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालं आहे.
मिठाईंच्या यादीत मोदकांनी पहिला नंबर पटकावला. मुंबईकरांनी सगळ्यात जास्त पसंती मोदकांनाच दिली. त्यापाठोपाठ लाडू आणि काजू कतली यांनाही ग्राहकांनी चांगली पसंती दिली, म्हणजे या दोन गोड पदार्थांच्या ऑर्डर्सचा नंबर मोदकांनंतर लागला.
मोदकांबद्दलचं हे प्रेम मोठ्या ऑर्डर्समधूनही दिसून आलं. एका ग्राहकाने तर फक्त मोदकांवरच Rs 8,277 इतका खर्च केला, यावरूनच मोदकांसाठी मुंबईकरांनी किती मनापासून खिसा सैल सोडला हे लक्षात येतं.
संपूर्ण उत्सवात खरेदीचा कल धार्मिक विधींशी जुळणाराच राहिला. 13 सप्टेंबरला सकाळी 10:12 वाजता मोदकांच्या ऑर्डर्सने उच्चांक गाठला, तर त्याच दिवशी दुपारी 2:27 वाजता एकूण मिठाईंच्या मागणीतही मोठी वाढ नोंदवली गेली. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7:45 वाजता फुलांच्या ऑर्डर्सने उच्चांक गाठला, तर सकाळी 8:47 वाजता पूजासाहित्याची मागणी शिखरावर पोहोचली. म्हणजे गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी नेमक्या याच वेळेत घराघरातून जोरात सुरु होती हे यावरून दिसतं. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि घर सजवण्यासाठी 19 सप्टेंबरला साफसफाईच्या साहित्याचीही मागणी लक्षणीयरीत्या वाढलेली दिसली.
गणेशोत्सव जोरात साजरा करणाऱ्या मुंबईकरांनी यंदा सोनं खरेदी आणि भेटवस्तूंवरही खिसा सैल सोडला. भायखळा भागातील एका ग्राहकाने वेगवेगळ्या ऑर्डर्समधून तब्बल Rs 3.88 लाख खर्च केले. याशिवाय जुहू आणि कासारवडवली येथील ग्राहकांनीही मोठी खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
शहरातील सगळ्यात मोठ्या खरेदी ऑर्डर्समध्ये सोनं आणि चांदीची पूजेची नाणी सर्वाधिक दिसली. दुसऱ्या क्रमांकाच्या ऑर्डरमध्ये 24 कॅरेट सोन्याचं नाणं, मोतीचूर लाडू आणि काजू कतली यांचा समावेश होता. तर तिसऱ्या क्रमांकाच्या ऑर्डरमध्ये सोन्याचं नाणं, फुलांच्या माळा आणि पूजासाहित्य होतं. म्हणजे सोन्याची नाणी आणि गोडाधोडाचं मिश्रण हेच यंदा मोठ्या ऑर्डर्समागचं सूत्र होतं असं दिसतं.
बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी मोदकांची मागणी प्रति मिनिट जवळपास 100 ऑर्डर्सपर्यंत पोहोचली होती, यावरूनच यंदाच्या गणेशोत्सवातील मोदकप्रेमाची कल्पना येते.