बाप्पाच्या विसर्जनासाठी घरी बनवा हलवाई स्टाईल केसर मलाई मोदक
गणेश विसर्जन जवळ आल्याने बाप्पाला खास नैवेद्य म्हणून मऊ, मलाईदार केसर मलाई मोदक घरीच तयार करता येतील, त्याची सोपी रेसिपी.
गणेशोत्सवात घराघरात मोदकांचा घमघमाट सुरू असतो. उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक हे नेहमीचे प्रकार असले तरी आता सणासुदीला वेगळ्या चवीचे आणि देखणे मोदक बनवण्याचाही ट्रेंड वाढला आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मऊसूत, मलाईदार आणि सुगंधी केसर मलाई मोदक. दूध आणि मावा वापरून हा मोदक तयार केला जातो, त्यामुळे चवीला तो जितका छान लागतो तितकाच दिसायलाही सुंदर दिसतो. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा घरी येणाऱ्या पाहुण्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी हा मोदक चांगला पर्याय ठरू शकतो. यात घातलेल्या केशरामुळे मोदकाला खास रंग आणि सुगंध मिळतो, तर वरून बदाम, पिस्ता किंवा काजूने सजावट केल्यास मोदकाचं रूप अजूनच खुलतं. बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ येत असताना ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करता येईल.
हा मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य असं - २५० ग्रॅम मावा, १०० ग्रॅम साखर, ३ ते ४ चमचे दूध, ८ ते १० केशराच्या काड्या, १ चमचा वेलची पूड, १ चमचा तूप, २ चमचे बारीक चिरलेले बदाम, २ चमचे बारीक चिरलेले पिस्ते आणि सजावटीसाठी थोडं केशर व पिस्त्याचे काप.
रेसिपी करताना आधी कोमट दुधात केशराच्या काड्या घालून काही मिनिटे तसंच बाजूला ठेवायचं, म्हणजे केशराचा रंग आणि सुगंध दुधात चांगला उतरतो. मग कढई गरम करून त्यात तूप घालायचं आणि नंतर मावा टाकून मंद आचेवर सतत ढवळत भाजायचं. मावा वितळून मऊ झाला की त्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर माव्यात केशर घातलेलं दूध ओतून मिश्रण एकजीव करायचं आणि मंद आचेवरच सतत ढवळत राहायचं.
पुढे यात साखर घालून नीट मिसळायची. साखर विरघळल्यावर मिश्रण थोडं पातळ होतं, ते पुन्हा घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवायचं. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की त्यात वेलची पूड, बदाम आणि पिस्ते घालून सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. मिश्रण कढईच्या तळाला चिकटायचं बंद होऊन एकसंध गोळ्यासारखं झालं की गॅस बंद करायचा आणि ते एका ताटात काढून थोडं कोमट होऊ द्यायचं.
त्यानंतर मोदकाच्या साच्याला हलका तुपाचा हात लावून त्यात तयार मिश्रण भरायचं, नीट दाबायचं आणि साचा उघडून मोदक हळुवार बाहेर काढायचा. वरून पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजावट करायची. तयार केसर मलाई मोदक काही मिनिटं थंड झाल्यावर सर्व्ह करता येतील.