गांधी जयंतीला बापूंचे विचार: २ ऑक्टोबरला मित्रमैत्रिणींना पाठवता येतील असे सुविचार
२ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण होत आहे. त्यांचे काही निवडक विचार येथे दिले आहेत.
२ ऑक्टोबरला गांधी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने सगळा देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहत आहे. हा दिवस फक्त बापूंना श्रद्धांजली वाहण्यापुरता नाही. त्यांचे विचार आणि जीवनमूल्ये समजून घेण्याचा आणि ती रोजच्या जगण्यात अंगीकारण्याचा संकल्प करण्याचाही हा दिवस आहे.
महात्मा गांधी यांचे जीवन अगदी साधे होते. पण त्यांच्या विचारांची खोली आणि त्यांचा प्रभाव यांनी फक्त भारतालाच नाही, तर सगळ्या जगाला प्रेरणा दिली. सत्य, अहिंसा, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वराज्य ही त्यांची तत्त्वे आजच्या काळातही तितकीच दिशा दाखवणारी आहेत.
गांधीजींनी सत्य आणि अहिंसा हाच आपल्या जीवनाचा मुख्य आधार मानला. त्यांच्या अहिंसक आंदोलनामुळे आणि सत्याग्रहामुळे स्वातंत्र्यलढ्याला मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबा मिळाला. हिंसेचा मार्ग न धरताही अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवता येतो, हा मोलाचा संदेश त्यांनी जगाला दिला. साधेपणा, सत्य, अहिंसा, समानता आणि मानवता ही मूल्ये कुठल्याही एका काळापुरती किंवा एका देशापुरती मर्यादित नाहीत, याची आठवण गांधी जयंती करून देते. समाज अधिक समृद्ध, शांततापूर्ण आणि सुंदर करण्यासाठी त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात.
गांधी जयंतीच्या निमित्ताने बापूंचे काही विचार मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करता येतील. त्यातले काही असे आहेत: अहिंसा हे कायरतेचे आवरण नाही, अहिंसा ही शूर व्यक्तीचा सर्वोच्च गुण आहे. अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी हिंसेच्या मार्गापेक्षा खूप जास्त धैर्याची गरज असते. अहिंसेशिवाय सत्याची अनुभूती होऊ शकत नाही. अहिंसेचे पहिले तत्त्व म्हणजे प्रत्येक अमानुष गोष्टीशी असहकार करणे.
या पृथ्वीवर उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहेत, माणसाच्या हाव-लोभाची पूर्तता करण्यासाठी नाहीत. प्रेमाची शक्ती ही दंडाच्या शक्तीपेक्षा हजार पटीने अधिक प्रभावशाली आणि स्थायी असते. डोळ्याच्या बदल्यात डोळा ही वृत्ती संपूर्ण जगाला आंधळे करून सोडेल. निःशस्त्र अहिंसेची ताकद कोणत्याही परिस्थितीत सशस्त्र ताकदीपेक्षा नेहमीच श्रेष्ठ आणि महान असेल.
पापाचा तिरस्कार करा पण पापी व्यक्तीचा नाही; क्षमाशीलता ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. स्वतःला ओळखण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला इतरांच्या सेवेत पूर्णपणे झोकून देणे. चुका करण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर तशा स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरत नाही. एखाद्या देशाची महानता आणि त्याची नैतिक प्रगती ही तेथील प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते यावरून सहज ठरवता येते.
बापूंचे आणखी काही सुविचार असे आहेत: "तुम्हाला जगात जो बदल पाहायचा आहे, तो बदल तुम्ही स्वतः आधी बनले पाहिजे." - महात्मा गांधी. "सामर्थ्य हे शारीरिक क्षमतेतून येत नाही, तर ते अजिंक्य इच्छाशक्तीतून येते." - महात्मा गांधी. "जेव्हा तुम्ही काय विचार करता, काय बोलता आणि काय करता या तिन्हींमध्ये सुसंवाद असतो, तेव्हाच खरा आनंद मिळतो." - महात्मा गांधी.
"माणूस हा त्याच्या विचारांची निर्मिती आहे. तो जसा विचार करतो, तसाच तो बनतो." - महात्मा गांधी. "पहिले ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग तुमच्यावर हसतील, मग तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल." - महात्मा गांधी.