कार-बाईकचा विमा काढताना या पाच चुका टाळा, नाहीतर क्लेम अडकू शकतो
विमा काढताना घाई केली तर गरजेच्या वेळी कंपनी क्लेम नाकारू शकते. स्वस्त प्रीमियम, तुलना, ऑनलाईन विमा, नावावर ट्रान्सफर आणि फॉर्मची माहिती या पाच गोष्टींकडे लक्ष द्या.
आजच्या काळात गाडी असणं गरजेचं झालं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या गाडीचा विमा काढणं. सध्या अपघातांची संख्या वाढत असल्याचं दिसतं. भारतात गाडीला विमा असणं कायद्याने बंधनकारक आहे आणि विमा नसेल तर दंड भरावा लागतो. पण हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही. रस्त्यावर अपघात झाला, गाडी चोरीला गेली किंवा काही नुकसान झालं, तर लाखो रुपयांचा भुर्दंड पडू शकतो.
यातून वाचण्यासाठीच विम्याची गरज असते. मात्र बऱ्याच जणांना विमा काढताना काय काळजी घ्यायची हे माहितीच नसतं. घाईघाईत विमा काढला जातो आणि खरी गरज पडते तेव्हा कंपनी क्लेम नाकारते. मग सगळा खर्च खिशातून करावा लागतो. म्हणून या पाच चुका टाळायला हव्यात.
पहिली चूक म्हणजे फक्त सगळ्यात स्वस्त विमा शोधणं. अनेक जण सगळ्यात कमी प्रीमियम असलेला विमा घेतात. पण कमी पैशात विमा देणाऱ्या कंपन्या बऱ्याच गोष्टींना कव्हरच करत नाहीत. वरून स्वस्त वाटतं, पण अपघात झाल्यावर कळतं की त्यातून काहीच मिळत नाही. काही कंपन्या प्रीमियम कमी घेतात, पण क्लेम देताना खूप त्रास देतात आणि महिनोन्महिने फिरवतात. म्हणून फक्त प्रीमियम बघू नका. कंपनी किती जुनी आहे, तिची विश्वासार्हता काय, कॅशलेस गॅरेज किती आहेत, क्लेम लवकर पास होतो का, हे सगळं पाहूनच विमा घ्या.
दुसरी चूक म्हणजे इतर कंपन्यांशी तुलना न करणं. आजकाल सगळं ऑनलाईन असतानाही लोक एकाच एजंटकडे जातात आणि त्याने सांगितलेला विमा घेतात. बाजारात दुसरे काय पर्याय आहेत हे बघितलंच जात नाही. विमा घेण्याआधी किंवा जुना विमा रिन्यू करण्याआधी 4-5 कंपन्यांचे प्लॅन ऑनलाईन तपासा. प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या ऑफर आणि वेगवेगळे फायदे देते. तुलना केली की कमी पैशात चांगलं कव्हरेज कुठे मिळतं ते कळतं. हे दोन मिनिटांचं काम आहे, पण हजारो रुपये वाचू शकतात.
तिसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन विमा महाग असतो हा गैरसमज. अनेकांना वाटतं की एजंटकडून ऑफलाईन घेतला तर स्वस्त पडेल, पण प्रत्यक्षात उलटं आहे. ऑनलाईन विमा घेतला तर कंपनीला एजंटला कमिशन द्यावं लागत नाही आणि ऑफिसचा खर्चही वाचतो. त्यामुळे तीच कंपनी ऑनलाईन कमी किमतीत जास्त चांगला विमा देते. ऑनलाईनवर डिस्काउंट आणि एक्स्ट्रा ऑफरही जास्त असतात. म्हणून ऑफलाईन घेण्याआधी एकदा ऑनलाईन किंमत नक्की बघा.
चौथी चूक सेकंड हँड गाडी घेतल्यावर होते. जुनी गाडी घेणारे इथेच सगळ्यात जास्त फसतात. गाडी घेतली की ते फक्त RTO मध्ये नावावर करतात आणि काम झालं असं समजतात. पण विम्याचं काय? RTO मध्ये गाडी नावावर केली म्हणजे काम संपलं नाही. जुन्या मालकाच्या नावावर असलेला विमा 14 दिवसांच्या आत तुमच्या नावावर करून घ्यावा लागतो. विमा जुन्याच मालकाच्या नावावर राहिला आणि तुमच्या हातून अपघात झाला, तर कंपनी एक रुपयाही देणार नाही. विमा तुमच्या नावावरच नाही, असं ती म्हणेल आणि सगळा खर्च तुम्हालाच करावा लागेल. म्हणून सेकंड हँड गाडी घेतली की आधी विमा ट्रान्सफर करा.
पाचवी चूक म्हणजे फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरणं. प्रीमियम कमी यावा म्हणून किंवा नकळतपणे लोक चुकीची माहिती भरतात. पत्ता चुकीचा, गाडीचं मॉडेल चुकीचं, किंवा गाडीला CNG किट बसवलं आहे हे लपवलं जातं. विमा हा विश्वासाचा करार आहे, त्यामुळे दिलेली प्रत्येक माहिती खरी असली पाहिजे. तुमचं नाव, पत्ता, इंजिन नंबर, चेसिस नंबर, आणि गाडी खाजगी वापरता की कमर्शियल, हे सगळं खरं खरं लिहा. काही लपवलं आणि नंतर कंपनीला कळलं, तर तुमचा क्लेम पूर्णपणे रद्द होऊ शकतो.
याशिवाय फक्त बेसिक विमा घेऊ नका. झिरो डेप, इंजिन प्रोटेक्शन, रोडसाईड असिस्टन्स यांसारखे ॲड-ऑन घ्या. थोडे जास्त पैसे लागतील, पण गरजेच्या वेळी तेच वाचवतील. लक्षात ठेवा, योग्य माहिती घेऊन काढलेला विमाच खऱ्या अडचणीत तुमची ढाल बनतो.