एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना आता 200 रुपयांच्या ओटीटी टॉप-अपमधून यूट्यूब प्रीमियम
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एअरटेलने यूट्यूबसोबत भागीदारी जाहीर केली आहे. प्रीपेड ग्राहकांना 200 रुपयांच्या ओटीटी टॉप-अपमधून जाहिरातमुक्त यूट्यूबसह यूट्यूब प्रीमियमचे फायदे मिळणार आहेत.
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या एअरटेलने शुक्रवारी भारतातील आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली. ग्राहकांना यूट्यूब प्रीमियमचे फायदे देता यावेत, म्हणून कंपनीने यूट्यूबसोबत भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. एका परवडणाऱ्या एंटरटेनमेंट टॉप-अपमधून ही ऑफर उपलब्ध करून दिली आहे.
आजकाल मोबाईल डेटा फक्त कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी वापरला जात नाही. वेगवेगळे कार्यक्रम आणि चित्रपट पाहणे, कंटेंट क्रिएटर्सना फॉलो करणे आणि संगीत ऐकणे यासाठीही तो वापरला जातो. ग्राहकांमध्ये मोबाईल डेटाचा वापर असा बदलत चालला आहे, हे लक्षात घेऊनच एअरटेलने ही घोषणा केली आहे.
एअरटेलने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सना यूट्यूब शॉर्ट्ससह जाहिरातमुक्त यूट्यूब पाहता येणार आहे. शिवाय बॅकग्राऊंड प्ले, ऑफलाइन डाऊनलोड आणि यूट्यूब म्युझिक प्रीमियमचाही लाभ त्यांना मिळणार आहे. म्हणजेच कार्यक्रम, चित्रपटांचे स्ट्रीमिंग, कंटेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ आणि संगीत अशा सर्व गोष्टी एअरटेलचे ग्राहक आता एकाच ठिकाणी पाहू शकतील.
जारी केलेल्या एका प्रेस नोटमध्ये एअरटेलने सांगितले की, त्यांच्या सध्याच्या प्रीपेड एंटरटेनमेंट पोर्टफोलिओमध्ये यूट्यूब प्रीमियमचा समावेश केला जात आहे. टेलिकॉम सेवा देणाऱ्या या कंपनीचे म्हणणे आहे की, जे ग्राहक व्हिडिओ पाहणे, क्रिएटर्सना फॉलो करणे, गाणी ऐकणे आणि नवीन कंटेंट शोधणे यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा खर्च करतात, त्यांच्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
ग्राहक एअरटेलच्या 200 रुपयांच्या ओटीटी टॉप-अपमधून यूट्यूब प्रीमियमचा लाभ घेऊ शकतात. या टॉप-अपमध्ये यूजर्सना 30GB एडिशनल डेटा आणि दुसऱ्या एंटरटेनमेंट सेवेचा ॲक्सेस मिळणार आहे. एअरटेलच्या सध्याच्या श्रेणीत प्राइम व्हिडिओ, जिओ-हॉटस्टार, झी5 प्रीमियम आणि सोनीलिव्ह यांसारख्या सेवांसह इतर 18 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधीच समावेश आहे.
एअरटेल ॲपमधून यूट्यूब प्रीमियम क्लेम करण्यासाठी प्रीपेड यूजर्सना 200 रुपयांचे टॉप-अप घेतल्यानंतर काही सोप्या स्टेप्स कराव्या लागतील. सर्वात आधी तुमचा पात्र एअरटेल प्रीपेड नंबर रिचार्ज केलेला असणे गरजेचे आहे, म्हणजे कनेक्शन ॲक्टिव राहते. त्यानंतर 30GB एडिशनल डेटा असलेले 200 रुपयांचे ओटीटी टॉप-अप खरेदी करायचे आहे.
मग स्मार्टफोनमध्ये एअरटेल ॲप उघडून रिवॉर्ड्स अँड ओटीटी सेक्शनमध्ये जायचे. तिथे दिसणाऱ्या यूट्यूब प्रीमियम बेनिफिटवर क्लिक करायचे आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांप्रमाणे यूट्यूब प्रीमियमचे फायदे क्लेम करायचे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.