एअर फ्रायर साफ करताना या चुका टाळा, हीटिंग सिस्टिम खराब होण्याची शक्यता
एअर फ्रायर वापरणाऱ्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत काही गोष्टींची विशेष काळजी घेतली नाही तर मशीनच्या परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो.
एअर फ्रायरमुळे स्वयंपाक करणं खूपच सोपं झालं आहे, आणि त्यामुळेच सध्या अनेक घरांमध्ये हे मशीन दिसतं. पण मशीन जितकं उपयोगी तितकीच त्याची निगा राखणंही महत्त्वाचं आहे. रोज वापरताना एका छोट्या चुकीमुळे सुद्धा मशीनच्या कामावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे स्वच्छता करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या या मशीनमध्ये तेल, चिकटपणा आणि खाण्याचे छोटे कण साचत राहतात. हे व्यवस्थित साफ केलं नाही तर मशीनच्या हीटिंग सिस्टिमला, वेंट्सना आणि नॉन-स्टिक कोटिंगला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एअर फ्रायर साफ करताना नेमकं कशाची काळजी घ्यायची, हे पाहूया.
सगळ्यात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे एअर फ्रायरची मुख्य बॉडी कधीच पाण्यात बुडवायची नाही, कारण त्यात इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतात. मुख्य भाग स्वच्छ करायचा असेल तर हलक्या ओल्या कापडाने किंवा कापसाने पुसून घ्यावा. कंट्रोल पॅनलपर्यंत ओलावा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, साफसफाई करण्याआधी प्लग नक्की काढून ठेवावा.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी वापरल्यानंतर बास्केट आणि ट्रे व्यवस्थित धुऊन घ्यायला हवेत. सतत वापर करून स्वच्छता केली नाही, तर त्यावर चिकटपणा आणि अन्नाचे कण साचतात. यामुळे पुढच्या वेळी जेवण बनवताना वास येऊ शकतो, आणि आधीच शिल्लक राहिलेल्या तेलामुळे जेवणाची चवही बिघडू शकते.
बास्केट किंवा ट्रे साफ करताना स्टील वूल, मेटल स्क्रबर किंवा फार खरखरीत स्पंज अजिबात वापरू नये, कारण त्यामुळे नॉन-स्टिक कोटिंग खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी सॉफ्ट स्पंज, सौम्य डिश सोप आणि कोमट पाणी वापरणं जास्त योग्य ठरतं. एखाद्या भागावर जास्तच चिकटपणा साचला असेल, तर तो भाग काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावा आणि नंतर स्वच्छ करावा.
हीटिंग एलिमेंटवरही अन्नाचे कण आणि चिकटपणा जमा होऊ शकतो. त्यासाठी आधी मशीन पूर्ण थंड करून आणि प्लग काढून, सॉफ्ट ब्रश किंवा टूथब्रशने हीटिंग एलिमेंट साफ करावं. या भागाकडे दुर्लक्ष केलं तर एअर फ्रायरच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
शेवटची आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लीच, ओवन क्लीनर किंवा इतर कुठलंही कठोर केमिकल वापरू नये, कारण त्यामुळे नॉन-स्टिक कोटिंगला इजा पोहोचू शकते. त्याऐवजी सौम्य डिश सोप आणि कोमट पाण्याचा वापर करूनच एअर फ्रायर स्वच्छ ठेवता येतं.