Apple Pay भारतात येणार, Axis Bank सोबत सुरुवातीला टायअप
आयफोन आणि Apple Watch युजर्ससाठी नवीन पेमेंट सिस्टीम ऑक्टोबर 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
आयफोन वापरणाऱ्या लोकांसाठी एक चांगली बातमी समोर आलीये. भारतात लवकरच Apple Pay सुरु होणार असल्याचं समजतंय. आत्तापर्यंत लोकांना गूगल पे किंवा फोन पे सारख्या अॅपवरुन पेमेंट करावं लागत होतं, पण आता Apple स्वतःची वेगळी पेमेंट सर्व्हिस सुरु करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑक्टोबर 2026 च्या सुरुवातीला Apple Pay भारतात अधिकृतपणे लॉन्च होऊ शकतं. यामुळे आयफोन आणि Apple Watch वापरणाऱ्यांना पेमेंट करणं आधीपेक्षा सोपं आणि फास्ट होईल.
सुरुवातीला Apple ने भारतात एन्ट्री घेण्यासाठी Axis Bank सोबत भागीदारी केलीये. म्हणजे पहिल्या टप्प्यात फक्त Axis Bank चं क्रेडिट कार्ड असणाऱ्या लोकांनाच Apple Pay वापरता येणार आहे. ज्यांच्याकडे Axis चं क्रेडिट कार्ड आहे, ते आपल्या आयफोनच्या Wallet मध्ये ते कार्ड ॲड करु शकतील. पण Apple चा भारतातला प्लॅन एवढ्यावरच थांबणार नाहीये, कंपनी HDFC Bank आणि ICICI Bank सारख्या मोठ्या बँकांसोबतही बोलणी करतेय. ही बोलणी नीट पार पडली तर या बँकांचे ग्राहकही पुढे Apple Pay वापरु शकतील.
Apple Pay प्रत्यक्षात काम कसं करणार हे पण समजून घेण्यासारखं आहे. यात NFC नावाचं टेक्नॉलॉजी वापरलं जाणार आहे, ज्याला सोप्या भाषेत Tap-and-Pay म्हणतात. कुठल्याही दुकानात किंवा मॉलमध्ये गेल्यावर पेमेंट करायचं असेल तर फक्त आयफोन किंवा Apple Watch पेमेंट मशीनजवळ न्यायचा आणि टॅप करायचा. काही सेकंदातच पेमेंट होऊन जाईल, त्यासाठी वेगळं अॅप उघडायची अजिबात गरज नाही.
सुरक्षिततेच्या बाबतीतही Apple ने पूर्ण काळजी घेतलीये. प्रत्येक पेमेंट करताना Face ID किंवा Touch ID वापरावं लागणार आहे, त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमच्या फोनवरुन पेमेंट करु शकणार नाही. समजा तुमचा फोन कोणी घेतला तरी तुमच्या चेहऱ्याशिवाय किंवा फिंगरप्रिंटशिवाय त्यातून पैसे कट होणार नाहीत. खरं तर RBI ने कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिकला परवानगी दिल्यामुळेच Apple Pay साठी भारतातला रस्ता मोकळा झालाय.
आता सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे UPI चं काय होणार. सध्या तरी ही सर्व्हिस फक्त क्रेडिट कार्डसाठीच असणार आहे, UPI त्यात लगेच जोडलं जाणार नाही. पण पुढे यात UPI पेमेंट सुद्धा जोडलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरु आहे. UPI आलं तर मात्र मोठा फरक पडेल, कारण भारतात सगळ्यात जास्त वापर UPI चाच होतो. यासाठी मात्र ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.