Axis Bank आणि Cognizant यांच्यात करार, ग्राहकांना मिळणार अधिक चांगली बँकिंग सेवा
Axis Bank आणि Cognizant यांनी एएमएस २.० उपक्रमांतर्गत बँकेच्या अॅप्लिकेशन मॅनेजमेंट सर्व्हिसेसची अंमलबजावणी पूर्ण करून गो-लाइव्हची घोषणा केली आहे.
देशातील खाजगी क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या Axis Bank ने आघाडीची एआय बिल्डर आणि तंत्रज्ञान सेवा कंपनी Cognizant सोबत मोठा करार केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी बँकेच्या भागधारकांसाठी एएमएस २.० या उपक्रमांतर्गत Cognizant च्या अॅप्लिकेशन मॅनेजमेंट सर्व्हिसेसची यशस्वी अंमलबजावणी झाल्याचे आणि याचा गो-लाइव्ह झाल्याचे जाहीर केले आहे.
एएमएस २.० हा एक संरचित आणि दोन्ही कंपन्यांनी मिळून चालवलेला उपक्रम आहे. डिलिव्हरी गव्हर्नन्स आणखी मजबूत करणे, ऑपरेशन्समध्ये सातत्य आणणे आणि अॅप्लिकेशन सपोर्ट सेवांमध्ये ऑटोमेशनचा वापर वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ऑटोमेशनवर आधारित पद्धतींनी बनवलेल्या या मॉडेलमध्ये गव्हर्नन्स, नियमांचे पालन आणि ऑपरेशनल शिस्तीवर खास भर दिला गेला आहे. यामुळे उत्पादकता, स्केलेबिलिटी आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण सोपे होणार असून, सेवेची विश्वासार्हता आणि खर्चातील कार्यक्षमता सुधारणे हेही या मॉडेलचे उद्दिष्ट आहे.
Axis Bank च्या नेतृत्वाखाली राबवला जाणारा हा एएमएस २.० उपक्रम बँकेच्या मोठ्या तंत्रज्ञान परिवर्तन प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सहयोगातून Axis Bank चा स्केलेबल, स्थिर आणि भविष्यासाठी तयार असलेला आयटी ऑपरेटिंग मॉडेल उभारण्यावरचा भर दिसून येतो. यामुळे बँकेच्या व्यवसायाची वाढ सोपी होईल, यंत्रणा अधिक विश्वासार्ह बनेल आणि महत्त्वाच्या बँकिंग प्लॅटफॉर्म्सवर भागधारकांना चांगला अनुभव मिळेल.
हा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला असून, यानुसार Cognizant Axis Bank सोबत बँकेच्या प्रमुख व्यवसाय विभागांना पाठबळ देण्यासाठी जवळून काम करणार आहे. यामध्ये शाखा आणि ऑपरेशन्स, कार्ड्स, कॉर्पोरेट बँकिंग आणि ट्रेझरी, कोअर प्लॅटफॉर्म्स व पेमेंट्स, फायनान्स व अकाउंटिंग, रिटेल व होलसेल बँकिंग, डेटा प्लॅटफॉर्म्स आणि इंटिग्रेशन या विभागांचा समावेश आहे.
या सहयोगाबद्दल बोलताना Axis Bank च्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड रिटेल ऑपरेशन्स विभागाचे ग्रुप हेड अविनाश राघवेंद्र म्हणाले की, एएमएस २.० ची अंमलबजावणी ही अधिक स्थिर, स्केलेबल आणि ऑटोमेशन-सक्षम ऑपरेशन्स मॉडेल उभारण्याच्या बँकेच्या प्रयत्नांचा भाग आहे. ते पुढे म्हणाले की, गुंतागुंतीच्या अॅप्लिकेशन वातावरणाला पाठबळ देण्यासाठी या परिवर्तनाच्या काळात Cognizant ने बँकेसोबत खूप जवळून काम केले असून, ऑपरेशनल परिणामकारकता वाढवण्यासाठी आणि बँकेच्या बदलत्या व्यावसायिक व तांत्रिक गरजा पूर्ण करण्यासाठी अॅप्लिकेशन मॅनेजमेंट सर्व्हिसेसअंतर्गत Cognizant सोबत पुढेही सहयोग करण्यास बँक उत्सुक आहे.
Cognizant चे आशिया पॅसिफिक आणि जपानमधील प्रेसिडेंट गणेश अय्यर यांनीही यावर मत मांडले. ते म्हणाले की, Axis Bank च्या एएमएस २.० उपक्रमाचा भाग म्हणून बँकेसोबत सहयोग करताना त्यांना खूप आनंद होत आहे. त्यांच्या टीम्स बँकेच्या अॅप्लिकेशन मॅनेजमेंट गरजा पूर्ण करण्यासाठी, शिस्तबद्ध पद्धतीने सेवा देण्यासाठी, गव्हर्नन्स-आधारित कामकाजासाठी आणि सिस्टीमची स्थिरता व कार्यक्षमता सुधारण्यासाठी ऑटोमेशनचा जबाबदार वापर करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले.