इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत ग्रीव्हजची मोठी झेप, TVS, Bajaj, Hero, Ather यांच्यापेक्षा वाढीचा दर जास्त
इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठ दर महिन्याला बदलताना दिसतेय आणि परदेशातील निर्यातीत आता चांगलाच वेग दिसतोय. यातच एक नवीन गोष्ट समोर आलीये, ती म्हणजे नव्या आणि तुलनेने लहान असलेल्या कंपन्यांनी या क्षेत्रातल्या मोठ्या ब्रँडना वाढीच्या बाबतीत मागे टाकलंय. FY27 च्या पहिल्या 5 महिन्यांचा, म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट 2026 या काळातला डेटा समोर आलाय. यात ग्रीव्हज इलेक्ट्रिकसारख्या कंपनीने TVS, Hero, Bajaj, Ather यांसारख्या मोठ्या ब्रँडना वार्षिक वाढीच्या (YoY Growth) बाबतीत मागे टाकलंय.
एप्रिल ते ऑगस्ट 2026 या काळात इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्यातीत सगळ्यात जास्त वाढ ग्रीव्हज इलेक्ट्रिकची झालीये. या 5 महिन्यात ग्रीव्हजने 169 गाड्यांची निर्यात केली, गेल्या वर्षी याच काळात फक्त 2 गाड्या निर्यात झाल्या होत्या. म्हणजे 2 वरून 169 पर्यंत, तब्बल 8350 टक्क्यांची वाढ.
दुसऱ्या क्रमांकावर हिरो मोटोकॉर्पची Vida आहे. हिरोच्या गेल्या वर्षी फक्त 3 गाड्या निर्यात झाल्या होत्या, यावर्षी हा आकडा 135 वर पोहोचलाय, म्हणजे 4400 टक्क्यांची वाढ. तिसऱ्या क्रमांकावर बजाज ऑटो आहे, बजाजने 4,818 गाड्या निर्यात केल्या, गेल्या वर्षी हा आकडा 210 होता, म्हणजे 2194 टक्के वाढ. चौथ्या क्रमांकावर एथर एनर्जी आहे, एथरने 3,573 गाड्या पाठवल्या, गेल्या वर्षी हा आकडा 742 होता, म्हणजे 382 टक्के वाढ. पाचव्या क्रमांकावर TVS मोटर आहे. TVS ने या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त, 6,702 गाड्यांची निर्यात केली, गेल्या वर्षी हा आकडा 1,850 होता. पण वाढीचा टक्का बघितला तर तो फक्त 262 टक्के इतकाच आहे. म्हणजे गाड्या जास्त विकल्या गेल्या पण वाढीचा दर कमी राहिला. यावरून एक गोष्ट लक्षात येते, मोठ्या कंपन्या जास्त गाड्या विकतायत, पण छोट्या कंपन्या मात्र खूप वेगाने वाढतायत.
फक्त परदेशातच नाही, तर भारतातही ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी म्हणजे GEM ने एक मोठा टप्पा गाठलाय. जून 2026 पर्यंत त्यांनी 3 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विकल्यात. हा आकडा Vahan पोर्टलवरचा आहे आणि यात ग्रीव्हज आणि अँपिअर या दोन्ही ब्रँडचे आकडे धरलेले आहेत. मे 2019 पासून ते 17 जून 2026 पर्यंत त्यांनी एकूण 3,00,293 गाड्या विकल्या आहेत. यातली सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे शेवटच्या 50,000 गाड्या फक्त 8 महिन्यात विकल्या गेल्यात.
मार्च 2026 पासून या कंपन्यांची विक्री खूपच जोरात सुरू आहे, कारण लोक आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळतायत. आणि हे फक्त मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत घडत नाहीये, तर छोट्या कंपन्याही वेगाने पुढे येतायत. निर्यातीच्या बाबतीत तर त्यांनी पूर्ण गेमच बदलून टाकलाय. FY27 संपेपर्यंत हे आकडे आणखी बदलू शकतात, पण सध्यातरी ग्रीव्हजने या सगळ्यांना मागे टाकलंय.