दुबईहून तेल अवीवला निघालेल्या विमानात पायलटांची चाकूने हाणामारी, तबूकला लँडिंग
Flydubai FZ1073 विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन पायलटांत हाणामारी झाली आणि चाकू हल्ल्यापर्यंत गेली; विमान अखेर सौदी अरेबियाच्या तबूक विमानतळावर सुरक्षित उतरले.
दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे निघालेल्या Flydubai FZ1073 या विमानात अचानक दोन पायलटांमध्ये हाणामारी सुरू झाली. सुरुवातीला हाणामारी असलेला हा प्रकार पुढे वाढत गेला आणि त्याचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले.
दोघे एकमेकांशी भांडण्यात गुंतल्यामुळे विमान चालवण्याचे काम बाजूला राहिले आणि विमानाची उंची झपाट्याने कमी होऊ लागली. हे पाहून विमानातील प्रवाशांनी दंगा करायला सुरुवात केली, सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. कॉकपिटमध्ये मारामारी चालू असतानाच विमानातून जमिनीवर विमान हायजॅक झाल्याचा संदेश गेला. त्यामुळे सगळी यंत्रणा तातडीने कामाला लागली.
ही बातमी कळताच इस्रायली प्रशासन आणि सरकार ताबडतोब हालचालीत आले. विमानातील प्रत्येकाची माहिती घ्यायला त्यांनी सुरुवात केली. विमानात कोणी महत्त्वाची व्यक्ती आहे का, हेही तपासले जाऊ लागले. याच दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही पायलट अनुक्रमे रशियन आणि युक्रेनियन असल्याचे सांगितले गेले.
हे घडले कशामुळे, असा प्रश्न पडतो. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर तोडीसतोड हल्ले करत आहेत. दोन्ही देशांत राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आहे आणि दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. अशा रागाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनचे नागरिक असलेले पायलट एकाच विमानाचे उड्डाण करायला एकत्र आले आणि त्यांच्यात संघर्ष सुरू झाला, असे सांगितले जाते.
दोघांची देशभक्ती प्रवाशांच्या जिवावर बेतली. विमानात सर्व वयोगटांचे इस्रायली नागरिक होते आणि ते जिवाच्या आकांताने ओरडू लागले. कॉकपिटमध्ये एकमेकांना मारून शांत झाल्यानंतर दोन्ही पायलटांनी समजूतदारपणा दाखवला आणि विमान सौदी अरेबियाच्या तबूक विमानतळावर उतरवले. तेव्हा कुठे इस्रायलचे प्रशासन आणि विमानातील प्रवासी यांनी खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास टाकला.
हायजॅकचा संदेश मिळाल्यावर इस्रायल सरकार पटकन सावध झाले. विमानाच्या प्रत्येक हालचालीवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली. कारण याआधी इस्रायलसोबत अशा खूप गोष्टी घडल्या आहेत, आणि आताची युद्धाची परिस्थिती पाहता काहीही होऊ शकते, या शक्यतेने विमानाकडे पाहिले जात होते. त्याच वेळी हे विमान सौदी अरेबियाच्या तबूक विमानतळावर उतरवणे शक्य असल्याचे समोर आले. प्रशासनाने लगेच तसे आदेश दिले आणि विमान तिथे उतरवण्यात आले. अशा आपत्कालीन वेळी उड्डाण रद्द करणे हाच चांगला मार्ग असल्याने हा पर्याय निवडला गेला, असे बोलले जाते आहे.
पायलटांचा विमानावरचा ताबा सुटल्याने विमानाने गाठलेली उंची अचानक खाली येऊ लागली. साधारणपणे विमान उंची कमी करताना ते पटकन खाली घेत नाहीत. इथे मात्र विमान सरळ वेगाने खाली येऊ लागल्याने गोंधळ उडाला. सगळ्यांचे ऑक्सिजन मास्क खाली आले. पण काही सेकंदांनी पायलटांनी विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवले आणि सुरक्षित लँडिंग केले.