DTU मध्ये 'सेवा फर्स्ट' चॅलेंज सुरू, गावातील समस्यांवर उपाय शोधणाऱ्यांना २ कोटींची बक्षिसे
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने युवांसाठी राष्ट्रीय पातळीवरचे इनोव्हेशन चॅलेंज सुरू केले असून, स्थानिक आणि राष्ट्रीय समस्यांवर व्यवहार्य उपाय शोधणाऱ्या सहभागींना मोठी बक्षिसे मिळणार आहेत.
दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर नवीन आणि उपयुक्त उपाय शोधण्याची संधी युवांना मिळावी, यासाठी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने (DTU) एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. या युनिव्हर्सिटीत 'सेवा फर्स्ट' या नावाने राष्ट्रीय यूथ इनोव्हेशन चॅलेंजची सुरुवात करण्यात आली आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांच्या हस्ते १९ सप्टेंबर रोजी डीटीयू कॅम्पसमध्ये या चॅलेंजचा शुभारंभ झाला. १०० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण २ कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या चॅलेंजचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ कल्पना मांडून भागणार नाही. सहभागींना समस्या नेमकी काय आहे हे ओळखण्यापासून सुरुवात करावी लागेल, त्यावर उपाय शोधावा लागेल, त्या उपायाचा प्रोटोटाईप बनवावा लागेल, त्याची चाचणी घ्यावी लागेल आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तो उपाय किती उपयोगी ठरतो, हेही तपासावे लागेल. भविष्यातही लागू करता येतील असे व्यवहार्य उपाय तयार करणे, हा या चॅलेंजमागचा मुख्य हेतू आहे.
राष्ट्रीय पातळीवरील आणि स्थानिक समुदायाशी संबंधित समस्यांसाठी वेगवेगळी क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शेती व ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा, पर्यावरण, शहरी समस्या आणि वाहतूक अशा विषयांचा समावेश आहे. याखेरीज एआय, रोबोटिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट मोबिलिटी, पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या विषयांवरही नवकल्पना मांडता येतील. स्थानिक पातळीवरच्या चॅलेंजमध्ये सहभागी आपल्या आजूबाजूची खरी समस्या ओळखून त्यावर उपाय सुचवू शकतात.
या स्पर्धेत सहभागी होण्याची व्याप्तीही मोठी आहे. शाळा आणि आयटीआय स्तरापासून ते डिप्लोमा, यूजी, पीजी आणि पीएचडीचे विद्यार्थी यात भाग घेऊ शकतात. याशिवाय स्टार्टअप्स, एमएसएमई, संशोधन संस्था आणि सरकारी लॅब्सही ठरवून दिलेल्या श्रेणींनुसार सहभागी होऊ शकतात. इच्छुक व्यक्ती एकटे किंवा टीम करून सहभागी होऊ शकतात. डीटीयू या उपक्रमासाठी उत्तर विभागाचे समन्वय पाहत आहे, ज्यात दिल्लीसह हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड आणि लडाख यांचा समावेश आहे.
चॅलेंजची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने ठरवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात समस्या आणि त्यावरील कल्पना नेमकेपणाने ओळखली जाईल. सुरुवातीच्या तपासणीनंतर निवडलेल्या टीमना मेंटॉरशिप आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यानंतर सहभागी आपल्या उपायाचा प्रोटोटाईप तयार करतील आणि त्याची तांत्रिक तपासणी होईल. पुढच्या टप्प्यात हा उपाय प्रत्यक्ष किंवा तत्सम परिस्थितीत तपासून पाहिला जाईल. अंतिम टप्प्यात प्रोटोटाईपचे सादरीकरण आणि मूल्यमापन केले जाईल. कल्पनेपासून सुरू होऊन ती सत्यात उतरवणे आणि तिचे परिणाम सिद्ध करणे, हा संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यावर डीटीयूने भर दिला आहे.
कार्यक्रमादरम्यान डीटीयूने 'रुरल टेक्नॉलॉजी अँड कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम' या नव्या योजनेचीही घोषणा केली. २०२७-२८ या शैक्षणिक सत्रापासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना गावांमध्ये पाठवण्याची ही योजना आहे. तिथे जाऊन विद्यार्थी स्थानिक समस्या ओळखतील आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर उपाय काढण्यासाठी काम करतील. अभियांत्रिकी, उद्योजकता आणि ग्रामीण सामाजिक विकास यांची सांगड घालणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील गरजा नीट समजून घेऊन त्यासाठी व्यावहारिक तांत्रिक उपाय तयार करणे, हे यामागचे लक्ष्य आहे. 'सेवा फर्स्ट चॅलेंज'मध्ये निवड होणाऱ्या आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना बक्षिसांसोबतच तज्ज्ञ, उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळणार आहे.