डोंबिवलीत मंगळवारी 16 तास पाणी बंद, मुख्य जलवाहिनीची गळती काढण्यासाठी शटडाऊन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी 3 नोव्हेंबरला सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली शहरातल्या रहिवाशांनी येत्या मंगळवारसाठी पाण्याची तजवीज आधीच करून ठेवावी लागणार आहे. शहराच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून ती थांबवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तांत्रिक कामामुळे डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:00 वाजल्यापासून रात्री 12:00 वाजेपर्यंत, म्हणजे सलग 16 तास, शहरात पाणी येणार नाही. शटडाऊन संपल्यानंतरही लगेच सगळे सुरळीत होणार नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी शहरात कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. म्हणूनच पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी किमान एक ते दोन दिवस पुरेल एवढा साठा आधीच करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.
डोंबिवली शहराला मुख्य पाणीपुरवठा नेतिवली टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रातून होतो. तिथून 1100 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी खंबाळपाडामार्गे पाथर्ली भागातील जुन्या रामचंद्र सिनेमागृह परिसरातल्या जलकुंभांमध्ये आणले जाते. तिथून ते संपूर्ण पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत वितरित केले जाते. याच जलवाहिनीला खंबाळपाडा परिवहन आगाराजवळ मोठी गळती लागल्याचे समोर आले आहे. पाणी वाया जाऊ नये म्हणून ही गळती तातडीने बंद करणे गरजेचे असल्याने हा 16 तासांचा शटडाऊन घेतला जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांची रोजची पाण्याची एकूण गरज सुमारे 365 दशलक्ष लीटर आहे. पाणीटंचाई असलेल्या भागात पालिका रोज सुमारे 15 टँकरने पाणी पोहोचवते. डोंबिवलीत तीव्र टंचाई किंवा पाण्याचे गैरवाटप होऊ नये म्हणून 15 वर्षांपूर्वी तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, उपअभियंता प्रमोद उपाध्ये आणि कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी प्रभागवार पाणीवाटपाची (झोनिंग सिस्टिम) पद्धत सुरू केली होती. त्याच प्रणालीतून आजही सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीन पाळ्यांत शहरात नियमित पाणीपुरवठा होतो.
पालिका हद्दीत जुन्या नगरपालिकेच्या काळातल्या अनेक भूमिगत जलवाहिन्या आहेत आणि त्यातून सतत गळती होत असते. सध्या सुमारे 28 टक्के पाणीगळतीचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे आणि ती रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. जुन्या फळीतले अनुभवी अभियंते सेवानिवृत्त झाल्याने भूमिगत जलवाहिन्यांत अडचण आली की नवख्या अभियंत्यांची त्रेधातिरपिट उडत असल्याचेही दिसून येत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.