पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेटसाठी अग्निकुलला २०० कोटी रुपयांचा सरकारी निधी
भारतीय अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉसला 'अग्निबाण आरएलव्ही' या पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेटसाठी २०० कोटी रुपयांचा सरकारी निधी मिळाला आहे.
भारतीय अंतराळ स्टार्टअप 'अग्निकुल कॉसमॉस'ला पुनर्वापर करता येणारे प्रक्षेपण वाहन, म्हणजेच पुन्हा वापरता येणारे रॉकेट, विकसित करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा सरकारी निधी मिळाला आहे. या प्रकल्पाला 'अग्निबाण आरएलव्ही' असे नाव देण्यात आले आहे. भारत अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाला असून, त्यामुळे जागतिक अंतराळ बाजारपेठेत परदेशी कंपन्यांना कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.
या निधीसाठी तंत्रज्ञान विकास मंडळ आणि अग्निकुल कॉसमॉस यांच्यात २०० कोटी रुपयांचा करार झाला आहे. ही रक्कम संशोधन, विकास आणि नवोपक्रम निधी अंतर्गत देण्यात आली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि भारताला व्यावसायिक अवकाश प्रक्षेपणांचे जागतिक केंद्र बनवणे, हे या निधीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या २०० कोटी रुपयांच्या निधीचा सरळ अर्थ असा की, भारत आता एलॉन मस्कच्या 'स्पेसएक्स'सारखे रॉकेट तयार करण्याच्या दिशेने आक्रमकपणे पावले टाकत आहे. असे रॉकेट उपग्रहांना अवकाशात सोडू शकेल, त्यांना पृथ्वीवर परत आणू शकेल आणि पुन्हा प्रक्षेपणासाठी वापरता येईल.
या सरकारी मदतीच्या जोरावर अग्निकुल आपले सध्याचे तंत्रज्ञान टीआरएल-४ (टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल) वरून थेट टीआरएल-८ या प्रगत स्तरावर नेणार आहे. त्यात पुनर्वापर करता येणारा वरचा टप्पा, सेमी-क्रायोजेनिक लिक्विड प्रोपल्शन, डीप थ्रॉटलिंग, रीस्टार्ट क्षमता आणि अचूक अवतरण प्रोपल्शन प्रणाली अशा उच्च-तंत्रज्ञान वैशिष्ट्यांचा समावेश असेल.
सरकारने ही २०० कोटी रुपयांची रक्कम कोणत्याही नवख्या कंपनीवर लावलेली नाही, कारण अग्निकुल कॉसमॉसने आधीच आपली ताकद सिद्ध केली आहे. कंपनीने 'अग्निलेट' नावाचे, जगातील पहिले एकसंध थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन स्वतःच्याच कारखान्यात डिझाइन करून तयार केले. इतकेच नव्हे, तर मे २०२४ मध्ये कंपनीने आपल्या 'अग्निबान संॉटेंड' या एक-स्तरीय वाहनाचे पहिले उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले. तंत्रज्ञान विकास मंडळाने यापूर्वीही अग्निकुलला लहान उपग्रह वाहने विकसित करण्यात मदत केली आहे.
अग्निकुलचा प्रकल्प फक्त रॉकेटचा पहिला टप्पा पृथ्वीवर परत आणण्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण प्रक्षेपण प्रणाली शक्य तितकी पुन्हा वापरता येईल अशी बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भविष्यात रॉकेट प्रक्षेपणांची वारंवारता अनेक पटींनी वाढेल, असे सांगितले जात आहे.