'भूतम भय्यम'च्या कलाकारांची २५ दिवसांच्या वर्कशॉपमधून जमली गट्टी, दिग्दर्शकांनी सांगितली आठवण
मित्रांचा ग्रुप आणि एका गूढ नाण्याचं रहस्य असलेल्या 'भूतम भय्यम'च्या टीमने जवळपास दोन वर्षं मेहनत घेतली, असं दिग्दर्शकांनी सांगितलं.
मराठी सिनेसृष्टीत सध्या 'भूतम भय्यम' या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. दंतकथेच्या जगाभोवती फिरणाऱ्या या सिनेमात मित्रांचा एक ग्रुप एका गूढ नाण्याच्या रहस्यात अडकतो. ही वेगळी संकल्पना पडद्यावर आणण्यासाठी संपूर्ण टीमने जवळपास दोन वर्षं मेहनत घेतली. कलाकारांच्या कास्टिंगपासून वर्कशॉप, व्हिज्युअल लँग्वेज आणि बॅकग्राउंड म्युझिकपर्यंत अनेक गोष्टींवर दिग्दर्शक आणि टीमने सुरुवातीपासूनच बारकाईने काम केलं.
या चित्रपटासाठी Orange Juice Gangला कास्ट करायचं, हा विचार सुरुवातीपासूनच होता. कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांचं कास्टिंग फायनल झालं. त्यानंतर जवळपास २५ दिवस त्यांच्यासोबत वर्कशॉप घेण्यात आलं.
या वर्कशॉपमध्ये स्क्रिप्ट रीडिंग, कॅरेक्टरायझेशन आणि वेगवेगळे गेम्स घेतले गेले. विविध गोष्टी एक्सप्लोर करण्यापासून अनेक मूलभूत बाबींवर काम झालं. त्यामुळे कलाकारांना आपापल्या व्यक्तिरेखा समजून घेता आल्या आणि एकमेकांना जाणून घेण्याचीही संधी मिळाली.
चित्रपटातल्या मित्रांच्या ग्रुपमधलं नातं सहज आणि नैसर्गिक दिसावं, यासाठी या वर्कशॉपचा मोठा फायदा झाला, असं दिग्दर्शकांनी सांगितलं. शूटिंग सुरू होण्याआधीच कलाकारांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला, त्यामुळे त्यांच्यात चांगलं बॉन्डिंग तयार झालं.
याच बॉन्डिंगचा परिणाम चित्रपटातही दिसणार आहे. कॅमेऱ्यासमोर नुसता अभिनय करण्यापेक्षा कलाकारांनी प्रत्यक्षात एकमेकांना समजून घेतलं, म्हणूनच त्यांच्या नात्यातली सहजता पडद्यावर उतरली.
'भूतम भय्यम'चं जग उभं करताना व्हिज्युअल लँग्वेजवरही विशेष लक्ष देण्यात आलं. प्रॉडक्शन डिझायनर, डीओपी, कॉस्च्युम डिझायनर आणि लूक डिझायनर अशा वेगवेगळ्या विभागांनी एकत्र काम करून सिनेमाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला.
प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणावर तयारी झाली. दंतकथा, मिस्ट्री आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचं जग प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे उभं करण्यासाठी टीमने सुरुवातीपासूनच नियोजन केलं.
संगीतावरही सुरुवातीपासूनच काम झालं. म्युझिक डायरेक्टर श्रीनाथ मातरे आणि त्यांची टीम स्क्रिप्ट रायटिंगच्या टप्प्यापासूनच संगीत आणि बॅकग्राउंड म्युझिकवर काम करत होती. गाण्यांची मेकिंगही वेगळ्या पद्धतीने केली आहे. अनेक ठिकाणी कॉयरचा वापर झाला असून जवळपास ३० ते ४० मुलांनी बॅकग्राउंड म्युझिकसाठी दोन-तीन महिने रिहर्सल केली.
दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार, या सगळ्या प्रक्रियेतून चित्रपटाचा एक वेगळा आणि युनिक थेटरिकल एक्सपीरियन्स तयार झाला आहे. चित्रपटाचं जग उभं करणं, त्यातल्या व्यक्तिरेखा, कथा आणि मिस्ट्री प्रेक्षकांसाठी एक्साइटिंग करणं, ही दिग्दर्शक म्हणून सर्वात आव्हानात्मक आणि तितकीच उत्साहाची बाब होती. त्यामुळे 'भूतम भय्यम'ची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया दिग्दर्शकांसाठी एक वेगळा अनुभव ठरली आहे.