मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिया मिर्झाचा व्हिडीओ महापालिकेने हटवला, किशोरी पेडणेकर यांची भाजपवर टीका

दिया मिर्झाचा व्हिडीओ महापालिकेने हटवला, किशोरी पेडणेकर यांची भाजपवर टीका छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

प्रदूषणमुक्त दिवाळीच्या मोहिमेतला अभिनेत्री दिया मिर्झा यांचा व्हिडीओ महापालिकेने काढून टाकल्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप, अमित साटम आणि महापौर रितू तावडे यांच्यावर टीका केली.

मुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या जनजागृती मोहिमेवरून सध्या मुंबईत वेगळाच वाद सुरू झाला आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन या मोहिमेतून केले जात होते. त्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झा यांनी एक व्हिडीओ करून लोकांना आवाहन केले होते. भाजपने या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आणि आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर महापालिकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो व्हिडीओ काढून टाकण्यात आला.

मुंबईत वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दिवाळीच्या काळात ही विशेष मोहीम हाती घेतली होती. दिया मिर्झा यांनी व्हिडीओतून मुंबईकरांना फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले होते. दिवाळीचा आनंद घेताना पर्यावरणाची आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला होता.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने तो डिलीट केला, असे म्हटले जात आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. साटम म्हणाले, "दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाने शिकवू नयेत. दिवाळी ही आमची परंपरा आहे, ती आमच्या मुळापर्यंत रुजली आहे. आम्हाला कुणीही हे शिकवायला जाऊ नये."

व्हिडीओ काढल्यावर दिया मिर्झा यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "भलाईचा जमानाच राहिला नाहीये. या मोहिमेसाठी आपण कोणतेही पैसे घेतले नव्हते."

या सगळ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. महापालिकेवर टीका करत त्या म्हणाल्या, "महापालिकेने एकदा एखाद्या कलाकाराची जनजागृतीसाठी नियुक्ती केली आणि तो कलाकार मुंबईकरांना प्रदूषणाबाबत मोफत जनजागृती करत असेल, तर त्यात गैर काय? एकदा निर्णय जाहीर केल्यानंतर पुन्हा बॅकफूटवर जाणे, हे मुंबई महापालिकेला शोभनीय नाही. ही बाब निंदनीय आहे."

दिया मिर्झा यांच्याबद्दल बोलताना पेडणेकर म्हणाल्या, "दिया मिर्झा कोण आहेत, हे माहिती आहे का? त्यांनी देशाला अनेक पारितोषिके मिळवून दिली आहेत. त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला आहे. त्या तिथल्या पर्यावरणाच्या प्रश्नांवरही बोलतात. आपल्याला न पटणारी भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवणे, ही भाजपची पद्धत झाली आहे."

महापौर रितू तावडे यांच्याविषयी पेडणेकर म्हणाल्या, "महापौरांना तर या संपूर्ण प्रकरणाची माहितीच नाही. वारंवार त्यांचा अपमान होत आहे. अशा बालिश महापौरांना मी उत्तर देणार नाही. त्यांनी आधी महापालिकेचे कामकाज समजून घ्यावे."

अमित साटम यांच्याबद्दल त्यांनी म्हटले, "अमित साटम कोण आहेत? ते विधानसभेचे आमदार आहेत आणि भाजपचे पदाधिकारी असतील. मात्र, इथे महापौर बसले आहेत ना? मग महापालिकेचा कारभार महापौरांच्या माध्यमातूनच चालायला हवा. महापालिकेला स्वतःचे स्वतंत्र कायदे आणि अस्तित्व नाही का? मुंबई महापालिका भाजपच्या दावणीला बांधली आहे का? मुंबईकरांनी हे लक्षात घ्यावे की, मुंबईचा अपमान होत आहे आणि महापालिका प्रत्येक वेळी बॅकफूटवर जात आहे."

त्यामुळे हा विषय आता केवळ पर्यावरण जनजागृतीपुरता राहिलेला नाही. मुंबई महापालिका निर्णय कसे घेते, यावरून तो राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ