स्वतंत्र विदर्भासाठी २०२७ ची डेडलाईन; चंद्रपुरात 'मिशन २०२७' मेळावा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मेळाव्यात ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
चंद्रपूर येथील जिजाऊ लॉनमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 'मिशन २०२७' नावाचा जनजागृती मेळावा घेण्यात आला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला चंद्रपुरात पुन्हा जोर मिळाला आहे. ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य उभे करायचे, असा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. मेळाव्याच्या निमित्ताने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी शहरात दुचाकी रॅलीही काढण्यात आली.
माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला, तर ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी विदर्भाच्या विकासातील अनुशेष, सिंचन, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
"ना दान चाहिए, ना अनुदान चाहिए, हमे तो सिर्फ विदर्भ राज्य चाहिए" अशी घोषणा देत समितीच्या नेत्यांनी ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ निर्माण करण्याचा संकल्प केला. समितीने मांडलेल्या भूमिकेनुसार, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला १२१ वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे आणि ही मागणी आता निर्णायक टप्प्यावर न्यायची आहे.
नागपूर करार (१९५३) आणि १९५६ च्या घटनादुरुस्तीचे संदर्भ देत वक्त्यांनी सांगितले की, केंद्राने विदर्भाचे वैधानिक विकास मंडळ वेळेत उभारले नाही, त्यामुळे सिंचनाचा ६० हजार कोटी रुपयांचा निधी अडकला. परिणामी १३१ धरणे अपूर्ण राहिली आणि १४ लाख हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहिली, असे वक्त्यांचे म्हणणे होते. याच दुष्काळामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात ४७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा नेत्यांनी केला.
वक्त्यांच्या मते, विविध क्षेत्रांतील १५ हजार कोटींच्या अनुशेषामुळे विकासाला खीळ बसली आहे. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, बेरोजगारी, तरुणांचे स्थलांतर आणि महाराष्ट्रावरील ९ लाख ३७ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर पाहता, महाराष्ट्रात राहून विदर्भाचा ७५ हजार कोटींचा अनुशेष कधीही भरून निघणार नाही, असे मत वक्त्यांनी मांडले. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि नक्षलवाद यांसारख्या गंभीर प्रश्नांवर स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे, असेही वक्त्यांनी सांगितले.
मेळाव्यापूर्वी माता महाकालीचे आशीर्वाद घेऊन सुमारे पाचशे दुचाकींची रॅली शहरातून निघाली. मेळाव्यात अरुण केदार, प्रा. मंजुषा तिरपुडे, मुकेश मासुरकर, डॉ. रमेश गजबे, ॲड. दीपक चटप, शालिक माऊलीकर आणि विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुन्ना आवळे यांनी केले, संचालन मितीन भागवत यांनी केले, तर आभार सुरेश शंभरकर यांनी मानले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.