दिवाळीपूर्वी झटका, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन महागणार
कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे कंपन्यांनी घरगुती उपकरणांचे दर वाढवण्याची तयारी केली आहे, सणासुदीच्या खरेदीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दिवाळी आणि दसऱ्याच्या खरेदीचं बजेट आखणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर 1 ऑक्टोबर 2026 पासून वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे तो ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याच्या तयारीत अनेक कंपन्या आहेत आणि काही ब्रँड्सनी तर दरवाढ जाहीरही केली आहे.
कॉपर, स्टील, अॅल्युमिनियम आणि क्रूड ऑइलपासून बनणाऱ्या घटकांच्या किमती वाढल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. यात फ्रेट आणि सप्लाय चेनवरचा ताणही भर घालतोय. शिवाय वेस्ट एशियातल्या तणावामुळे चलनाच्या दरातही चढउतार होत असल्याचं उद्योगातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 2026 मधली ही तिसरी मोठी दरवाढ ठरणार आहे. काही कंपन्या ऑक्टोबरपासून नवे दर लावतील, तर काही नोव्हेंबरपासून.
एसीच्या किमतीत सगळ्यात जास्त, म्हणजे 5 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्स यांसारख्या कंपन्यांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 4 ते 10 टक्क्यांपर्यंत दरवाढीची घोषणा किंवा पुष्टी केली आहे. एलजी आणि हिताची या ब्रँडचे एसी बनवणाऱ्या बॉश होम कम्फर्टनेही एसीचे दर सुमारे 5 टक्क्यांनी वाढवल्याचं समजतं.
ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांच्या मते, कमोडिटीच्या किमती वाढल्यामुळे एसी आणि डीप फ्रीजरचे दर आधीच 5 ते 8 टक्क्यांनी वाढले आहेत. कॉपर, स्टील आणि प्लास्टिकसह अनेक कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानेच हा दबाव आल्याचं त्यांनी सांगितलं. ही ब्लू स्टारची 2026 मधली तिसरी दरवाढ आहे. मागच्या वर्षीच्या सणासुदीच्या तुलनेत उत्पादन खर्च सुमारे 15 टक्क्यांनी वाढलाय, पण ग्राहकांना सुमारे 10 टक्के जीएसटीचा फायदा मिळत असल्यामुळे निव्वळ परिणाम सुमारे 5 टक्केच जास्त असल्याचं थियागराजन म्हणाले.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांच्या मते, उद्योगात आणखी एक दरवाढ आता टाळता येणार नाही. मागच्या दरवाढीनंतर कमोडिटीच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी वाढल्यामुळे कंपन्यांवर खर्चाचा दबाव आलाय. त्यांच्या मते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 5 ते 7 टक्के दरवाढ होऊ शकते, पण प्रत्येक ब्रँड ती वेगवेगळ्या वेळी लागू करेल. मात्र सणासुदीत ग्राहकांना काही काळ जुन्याच किमतीत खरेदीची संधी मिळू शकते, कारण कंपन्या आणि डीलर्सनी ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच मोठ्या प्रमाणात जुना स्टॉक भरून ठेवलाय, जो साधारण दीड महिना पुरेल. दिवाळीनंतर मात्र नवे दर लागू होण्याची शक्यता जास्त असल्याचं नंदी सांगतात.
हायर इंडियाचे अध्यक्ष एन. एस. सतीश म्हणाले की, वाढत्या उत्पादन खर्चामुळे दरवाढ करणं गरजेचं झालंय, नाहीतर कंपन्यांना नुकसान सोसावं लागेल. दर वाढवल्यास विक्रीवर काही परिणाम होऊ शकतो, पण सध्या दुसरा पर्यायच नसल्याचं ते म्हणाले. हायर 1 ऑक्टोबरपासून रूम एअर कंडिशनरचे दर सुमारे 5 टक्क्यांनी वाढवणार आहे. इनपुट कॉस्ट असाच वाढत राहिला तर दिवाळीनंतर आणि पुन्हा जानेवारीतही दरवाढ होऊ शकते. एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इतर उपकरणांच्या किमतीतही 2 ते 3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
हायरच्या मते मागच्या वर्षभरात कॉपरच्या किमतीत मोठी उसळी आलीये आणि एसीच्या उत्पादनात कॉपर हा मुख्य कच्चा माल असल्यामुळे त्याचा फटका थेट बसतोय. सतीश यांच्या माहितीनुसार, मागच्या वर्षी कॉपरची किंमत साधारण 8,000 ते 9,000 अमेरिकी डॉलर प्रति मेट्रिक टन होती, ती आता 14,500 डॉलरपर्यंत गेलीये आणि आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका एसीमध्ये साधारण 3 ते 4 किलो कॉपर लागतं. त्यामुळे हायरने आतापासून जानेवारीपर्यंत एकूण सुमारे 15 टक्के दरवाढीचं नियोजन केलंय - 1 ऑक्टोबरपासून 5 टक्के, डिसेंबरच्या सुमारास आणखी 5 टक्के आणि जानेवारीत आणखी 5 टक्के.
डायकिन एअरकंडिशनिंग इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कंवलजीत जावा यांनी सांगितलं की कंपनीने 16 सप्टेंबरपासूनच एसीचे दर 8 ते 10 टक्क्यांनी वाढवलेत. त्यांच्या मते कॉपरच्या किमती जवळपास 25 ते 35 टक्क्यांनी वाढल्यात आणि डॉलर मजबूत होत असल्याने कमोडिटीच्या किमतीही वाढतायत. सध्या मागणी चांगली असल्याचं जावा म्हणाले, पण परिस्थिती सुधारली नाही तर पुढे मागणीवर परिणाम होऊ शकतो.
थॉमसन, कोडॅक आणि ब्लॉपंक्ट या टीव्ही ब्रँडचं भारतातलं उत्पादन आणि मार्केटिंग करणाऱ्या सुपर प्लास्ट्रॉनिक्स प्रा. लि. म्हणजे एसपीपीएलने ऑक्टोबरनंतर टीव्हीचे दर सुमारे 7 टक्क्यांनी वाढवण्याचं ठरवलंय, तर कंपनीच्या इतर उपकरणांचे दर आधीच 4 ते 5 टक्क्यांनी वाढलेत. एसपीपीएलचे संचालक अवनीत सिंग मारवाह यांच्या मते, सणासुदीत ग्राहकांना सवलत आणि ऑफर्सची अपेक्षा असते, त्यामुळे वाढलेल्या किमतींचा मागणीवर परिणाम होऊ शकतो. जागतिक अस्थिरता आणि वाढता उत्पादन खर्च ग्राहकांच्या मूडवरही परिणाम करू शकतो, असं ते म्हणाले.
पॅनासोनिक लाईफ सोल्युशन्स इंडियाच्या एसी विभागाचे उत्पादन विपणन आणि नियोजन प्रमुख अभिषेक वर्मा यांच्या मते, कंपनी बदलत्या बाजारपेठेवर लक्ष ठेवून आहे आणि किंमत व मागणी यांचा समतोल साधण्यासाठी परिस्थितीचं मूल्यमापन करतेय. उद्योगावर उत्पादन खर्चाचा मोठा दबाव असल्याचं त्यांनी मान्य केलं, पण दरवाढीबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही.
व्हिडिओटेक्सचे डायरेक्टर अर्जुन बजाज यांच्या मते, वाढता फ्रेट खर्च आणि सप्लाय चेनमधल्या अडचणींमुळे दिवाळीनंतर टीव्हीच्या किमतीची नवी पातळी तयार होऊ शकते. स्क्रीनच्या आकारानुसार फरक पडेल - छोट्या स्क्रीनच्या टीव्हीचे दर 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, तर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीत ही वाढ 10 टक्क्यांपर्यंत असू शकते.
ओणमपासून दसरा-दिवाळीपर्यंतचा काळ घरगुती उपकरण कंपन्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. उद्योगाशी संबंधित अहवालांनुसार, याच काळात कंपन्यांची वार्षिक विक्रीपैकी साधारण 30 ते 40 टक्के विक्री होते. त्यामुळे दरवाढीचा मागणीवर किती परिणाम होतो, यावर कंपन्यांचं लक्ष आहे. काहींना सणासुदीच्या मागणीला फटका बसण्याची भीती आहे, तर काहींना वाटतं की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डीलर्सनी जुन्या दरात खरेदी केलेल्या मोठ्या स्टॉकमुळे तात्काळ परिणाम मर्यादित राहील. त्यामुळे एसी, टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन घ्यायचा विचार असणाऱ्यांसाठी ऑक्टोबरआधीची खरेदी फायद्याची ठरू शकते, पण प्रत्यक्ष दरवाढ ब्रँड, उत्पादन आणि उपलब्ध स्टॉकनुसार वेगळी असू शकते.