दिवाळीसाठी घरीच करा मऊ दूध पेढे, फक्त मिल्क पावडर, दूध आणि तुपात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बाजारातल्या भेसळीची भीती टाळून दिवाळीत घरच्या घरी, थोड्या साहित्यात दूध पेढे कसे बनवायचे, त्याची सोपी कृती.
दिवाळी आली की घरोघरी आनंदाचं वातावरण असतं. लाईट्स, रांगोळी, फटाके आणि सगळ्यात महत्त्वाचा फराळ. दिवाळीत प्रत्येकाच्या घरी काहीतरी गोडधोड बनतंच. पण आजकाल बाजारातून पेढे आणायचे म्हटलं की मनात भीती असते. मावा खरा आहे का, साखर जास्त आहे का, भेसळ तर नाही ना, असे प्रश्न पडतात.
यावर उपाय सोपा आहे. यंदा दिवाळीत बाहेरचे पेढे आणण्याऐवजी घरच्या दुधाचे पेढे बनवा. दुकानात मिळतात तसेच मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे पेढे घरी होतात. यासाठी जास्त सामानही लागत नाही. फक्त 3-4 वस्तूंमध्ये पेढे तयार होतात. सगळं सामान घरातच मिळेल, त्यामुळे दुकानात पळायची गरज नाही.
साहित्य असं लागेल: मिल्क पावडर 2 मोठे कप, दूध 1 कप (साधं दूध चालेल), साजूक तूप 2 ते 3 चमचे, पिठी साखर अर्धा कप (गोड किती हवं त्यानुसार कमी जास्त करा), थोडी वेलची पूड आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप.
पहिली स्टेप म्हणजे मिश्रण तयार करणे. जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्या. गॅस चालू करून त्यात एक कप दूध, 2 कप मिल्क पावडर आणि 2 चमचे तूप टाका. चमच्याने सगळं एकत्र हलवा. अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत. एकदम प्लेन, गुळगुळीत पेस्ट झाली पाहिजे.
दुसरी स्टेप शिजवणे. गॅस एकदम बारीक ठेवा, हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मोठ्या आचेवर केलं तर मिश्रण जळेल. बारीक गॅसवर चमच्याने सारखं हलवत रहा. थोड्या वेळातच मिश्रण घट्ट होऊ लागेल. सुरुवातीला ते पातळ वाटेल, पण हळूहळू त्याला माव्यासारखा आकार येईल आणि ते कढई सोडायला लागेल. सगळं मिश्रण एका गोळ्याच्या रूपात एकत्र आलं की झालं, असं समजायचं. मग गॅस बंद करा.
तिसरी स्टेप पेढ्यांना आकार देणे. मिश्रण थोडं थंड होऊ द्या, पण पूर्ण थंड करू नका. कोमट असतानाच त्यात अर्धा कप पिठी साखर आणि थोडी वेलची पूड टाका आणि हाताने चांगलं मळून घ्या. हाताला थोडं तूप लावा, म्हणजे मिश्रण चिकटणार नाही. छोटा गोळा घेऊन दोन्ही तळहातांमध्ये गोल फिरवा. नंतर थोडं दाबून चपटं करा आणि मधोमध अंगठ्याने हलकं दाबा. असेच सगळे पेढे बनवून घ्या.
शेवटची स्टेप सजावट. तयार पेढ्यांवर पिस्त्याचे बारीक काप किंवा केशरच्या दोन-तीन काड्या लावा. त्यामुळे ते दिसायलाही दुकानासारखे छान दिसतील.
हे पेढे 4-5 दिवस आरामात ठेवता येतात. फ्रिजमध्ये ठेवले तर आठवडाभर टिकतात. या दिवाळीत बाजारातल्या भेसळयुक्त मिठाईला नकार द्या आणि घरच्यांना स्वतःच्या हाताने बनवलेले शुद्ध पेढे खाऊ घाला. पाहुण्यांना द्यायलाही हा चांगला पर्याय आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.