दिवाळीत नवी कार घ्यायची? बेस मॉडेलपासून 6 एअरबॅग असलेल्या 5 हॅचबॅक बजेटमध्ये
अल्टो K10, सेलेरिओ, टियागो, वॅगनआर आणि ग्रँड i10 निओस या पाच गाड्यांमध्ये आता 6 एअरबॅग मिळतात.
दिवाळी जवळ आली की घरोघरी काहीतरी नवीन घेण्याचा विचार सुरू होतो आणि अनेकांच्या यादीत नवी गाडी असते. पण गाडी निवडताना फक्त मायलेज किंवा लूक बघून चालत नाही, सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे. पूर्वी 6 एअरबॅग म्हणजे मोठ्या आणि महागड्या गाड्यांमध्येच मिळायच्या. आता कंपन्यांनी विचार बदलला असून अगदी बेस मॉडेलमध्येही 6 एअरबॅग मिळत आहेत. कमी बजेटमध्ये जास्त सेफ्टी हवी असेल तर या 5 गाड्या पाहता येतील.
पहिली गाडी मारुती अल्टो K10. किंमत 3.70 लाख ते 5.45 लाख. भारतात सगळ्यात जास्त विकली जाणारी गाडी म्हणून अल्टोची ओळख आहे. तिच्यात आधी फक्त 2 एअरबॅग मिळत होत्या. पण 2025 मध्ये मारुतीने मोठा बदल केला आणि बेस मॉडेलपासूनच 6 एअरबॅग स्टॅण्डर्ड दिल्या. जुन्या मॉडेलला GNCAP मध्ये 2 स्टार मिळाले होते, आता 6 एअरबॅगमुळे सेफ्टी वाढली आहे. कमी खर्चात कुटुंबासाठी सुरक्षित गाडी हवी असेल तर अल्टोला पर्याय नाही.
दुसरी गाडी मारुती सेलेरिओ. किंमत 4.70 लाख ते 6.75 लाख. 2021 मध्ये ही गाडी लॉन्च झाली तेव्हा तिच्यात 2 एअरबॅग होत्या. आता 2025 च्या नवीन अपडेटमध्ये सगळ्या व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग मिळत आहेत. याचा थेट फायदा क्रॅश टेस्टमध्ये दिसला. 2 एअरबॅग असताना फक्त 1 स्टार मिळायचा, तर 6 एअरबॅग आल्यावर 3 स्टार रेटिंग मिळाले आहे. म्हणजे पैशाच्या मानाने सेफ्टी डबल झाली.
तिसरी गाडी टाटा टियागो. किंमत 4.77 लाख ते 8.62 लाख. टाटाची ही सगळ्यात छोटी गाडी असली तरी सेफ्टीमध्ये ती मोठ्या गाड्यांना टक्कर देते. कंपनीने तिच्यातही 6 एअरबॅग स्टॅण्डर्ड केल्या आहेत आणि बॉडीही जास्त मजबूत केली आहे. जुन्या मॉडेलला 2020 मध्ये 4 स्टार मिळाले होते. नवीन मॉडेलची अजून टेस्ट झालेली नाही, पण त्याला याहून चांगले स्टार मिळतील, असे कंपनी सांगते.
चौथी गाडी मारुती वॅगनआर. किंमत 4.99 लाख ते 7.24 लाख. उंची आणि स्पेससाठी प्रसिद्ध असलेली ही फॅमिली कार अनेकांना आवडते. 2025 पासून वॅगनआरमध्येही 6 एअरबॅग स्टॅण्डर्ड येऊ लागल्या आहेत. 2023 मध्ये 2 एअरबॅग असलेल्या मॉडेलला फक्त 1 स्टार मिळाला होता. रोजच्या वापरासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी हा चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.
पाचवी गाडी ह्युंदाई ग्रँड i10 निओस. किंमत 5.60 लाख ते 8.09 लाख. 2019 मध्ये ही गाडी आली तेव्हा तिच्यात 2 एअरबॅग होत्या. नंतर टॉप मॉडेलमध्ये 6 एअरबॅग दिल्या गेल्या. 2023 च्या अपडेटनंतर आता सगळ्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग मिळतात. सेफ्टीबरोबरच भरपूर फीचर्सही मिळतात. 2020 मध्ये या गाडीला 2 स्टार मिळाले होते. स्टायलिश लूक आणि सुरक्षितता दोन्ही हवे असतील तर निओस चांगला ऑप्शन आहे.