मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीच्या सेलमध्ये खरेदी करताय? या पाच सायबर फसवणुकींपासून सावध राहा

दिवाळीच्या सेलमध्ये खरेदी करताय? या पाच सायबर फसवणुकींपासून सावध राहा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

सेल आणि ऑफर्सच्या काळात सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात ओढतात आणि बँक अकाऊंट रिकामं करतात. अशा पाच प्रकारच्या फसवणुकी कोणत्या ते जाणून घ्या.

दिवाळी सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. या निमित्ताने अनेक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळतात. त्यामुळे लोक स्मार्टफोन, लॅपटॉप, कपडे आणि घर सजवण्याच्या वस्तूंसह अनेक गोष्टी ऑनलाईन विकत घेतात. पण अशा वेळी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सेल आणि ऑफर्सचा काळ बघूनच सायबर गुन्हेगार संधी साधतात, लोकांची फसवणूक करतात आणि त्यांचे बँक अकाऊंट रिकामे करतात. लोकांची अगदी सहज फसवणूक होऊ शकते, अशा पाच सायबर फ्रॉडचे प्रकार खाली दिले आहेत.

पहिला प्रकार म्हणजे बनावट शॉपिंग वेबसाईट. सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या काळात सायबर गुन्हेगार अशा वेबसाईट तयार करतात, ज्या हुबेहूब खऱ्या वेबसाईटसारख्या दिसतात. तिथे स्मार्टफोन, टिव्ही आणि इतर वस्तू अत्यंत कमी किमतीत विकण्याचा दावा केला जातो. ही ऑफर बघून ग्राहक आकर्षित होतात आणि सामान ऑर्डर करतात. पण पेमेंट केल्यानंतर वस्तू पोहोचतच नाही, किंवा खराब झालेली वस्तू येते. त्यामुळे स्कॅम आणि फ्रॉडपासून वाचण्यासाठी नेहमी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच खरेदी करा.

दुसरा प्रकार सोशल मीडियावरच्या बनावट जाहिरातींचा आहे. दिवाळी सुरू होण्याआधीच इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दिवाळीच्या नावाने विविध जाहिराती दिसू लागतात. त्यात ब्रँडेड प्रोडक्ट्सवर 70 ते 80 टक्के डिस्काऊंट देण्याचा दावा केला जातो आणि खरेदीसाठी एक लिंकही दिलेली असते. ही लिंक ग्राहकाला बनावट वेबसाईटवर घेऊन जाते, जिथे फसवणूक होऊ शकते. म्हणून काहीही विकत घेण्याआधी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील ऑफर्स तपासून बघा.

तिसरा प्रकार क्यूआर कोडचा. दिवाळी गिफ्ट, कॅशबॅक किंवा इतर बक्षीस जिंकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार दिवाळीपूर्वी बनावट क्यूआर कोड पाठवतात. तो कोड स्कॅन केल्यावर यूपीआय पिन टाकण्याचा पर्याय समोर येतो आणि पिन टाकताच अकाऊंट रिकामं होतं. हे लक्षात ठेवा की पैसे मिळवण्यासाठी कोणताही क्यूआर कोड स्कॅन करावा लागत नाही आणि यूपीआय पिनही टाकावा लागत नाही.

चौथा प्रकार म्हणजे फेक डिलिव्हरी आणि रिफंड स्कॅम. सायबर गुन्हेगार बनावट मेसेज पाठवतात, त्यात तुमची ऑर्डर रद्द झाली आहे किंवा पार्सल वेळेत पोहोचू शकत नाही, असं लिहिलेलं असतं. डिलिव्हरीची वेळ बदलण्याची विनंती त्यात असू शकते, किंवा रिफंड मिळवण्यासाठी एखादी लिंक पाठवली जाऊ शकते. अशा लिंकवर क्लिक केल्यावर बँक डिटेल्स टाकायला सांगितलं जाऊ शकतं. तुम्ही दिलेली ती माहिती वापरून सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करू शकतात.

पाचवा प्रकार म्हणजे फेक कॅशबॅक आणि गिफ्ट्स. दिवाळीच्या काळात बक्षिसांच्या ऑफर्स, विशेष शॉपिंग बोनस किंवा कॅशबॅकचं आमिष दाखवून लोकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. ही बक्षिसे देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे लोक काही लिंकवर क्लिक करायला, बनावट फॉर्म भरायला किंवा 'प्रोसेसिंग फी' भरायला सांगू शकतात.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ