तुषार कपूर यांना बिश्नोई गँगच्या नावाने ५ कोटींच्या खंडणीचा फोन, पण कॉल बनावट असल्याचा पोलिसांना संशय
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
फोनवरील आवाज आणि हॅरी बॉक्सरच्या मूळ ऑडिओ नमुन्यातला आवाज जुळत नसल्याचे मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
अभिनेता तुषार कपूर यांना ५ कोटी रुपयांची खंडणी मागणारा धमकीचा फोन आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगितले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात वेगळीच गोष्ट समोर आली आहे. कॉलमधला आवाज आणि हॅरी बॉक्सरच्या मूळ ऑडिओ नमुन्यातला आवाज यांच्यात साम्य नसल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे हा कॉल बनावट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींना धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे, आणि त्यातलाच हा ताजा प्रकार असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, हॅरी बॉक्सर नावाच्या व्यक्तीने तुषार कपूर यांना फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. आपण लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहोत, असेही त्या व्यक्तीने कॉलमध्ये सांगितले होते. या धमकीच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग तपासासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
तुषार कपूर यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने मुंबई पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून, त्याची जबाबदारी खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने तुषार कपूर यांना मिळालेल्या धमकीच्या कॉलमधल्या आवाजाची तपासणी केली. तसेच हा आवाज पोलिसांच्या डेटाबेसमध्ये उपलब्ध असलेल्या हॅरी बॉक्सरच्या मूळ ऑडिओ नमुन्याशी जुळवून पाहण्यात आला. मात्र दोन्ही नमुन्यांमध्ये साम्य आढळले नाही, अशी माहिती पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते.
त्यामुळे प्राथमिक तपासात हा धमकीचा कॉल बनावट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई गँगचे नाव वापरून दहशत पसरवण्याचा प्रयत्न एखाद्या उपद्रवी व्यक्तीने केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
सध्या मुंबई पोलीस धमकीचा ऑडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. यामागे एखादी व्यक्ती आहे की संघटित टोळीचा सहभाग आहे, याचाही तपास सुरू आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढचा तपास करत आहेत.
तुषार कपूर हे बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध कपूर कुटुंबातले सदस्य आहेत. ते ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचे पुत्र आहेत. त्यांची बहीण एकता कपूर या हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातल्या प्रसिद्ध निर्मात्या आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.