नागपुरात डिजिटल अरेस्ट करून 1 कोटी 4 लाखांची फसवणूक; दोघांना उत्तर प्रदेशातून अटक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो वापरून एकाला व्हिडिओ कॉलवर डिजिटली अटकेत ठेवल्याचा प्रकार नागपुरात घडला. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने दोन आरोपींना अटक केली.
नागपूरमध्ये 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 1 कोटी 4 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या फोटोचा गैरवापर करण्यात आला, असे या प्रकरणात म्हटले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या दीनदयाल भागात राहणाऱ्या प्रविरकुमार तालुकदार यांना व्हिडिओ कॉलद्वारे 'डिजिटली' अटकेत ठेवण्यात आले. त्यासाठी पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांचा फोटो वापरण्यात आला. त्यानंतर एनआयएचे प्रदीप जैयस्वाल यांच्या नावाने भीती घालून तालुकदार यांना आरटीजीएसद्वारे 1 कोटी 4 लाख रुपये पाठवायला भाग पाडले गेले.
नांगरे पाटील यांचा फोटो आणि आवाजाची नक्कल करून हा प्रकार करण्यात आला, असेही सांगितले जाते. नांगरे पाटील यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ते पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे गुन्हेगारी विश्वातही त्यांच्या नावाचा दरारा आहे.
या घटनेनंतर पोलीस तातडीने कामाला लागले. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने तपासाची चक्रे फिरवली आणि दोघा आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली. दिनेश अवाभाई रावरीया आणि अरविंद कानजी गाला अशी या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात एका रस्त्याजवळच्या पुलाखाली 102 काडतुसे म्हणजे बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे तिथेही खळबळ उडाली. पोलिसांनी जप्त केलेल्या गोळ्यांपैकी 52 जिवंत आहेत, तर उरलेल्या 50 रिकाम्या पुंगळ्या आहेत.
सगळ्या 102 गोळ्या भारतातील वेगवेगळ्या ऑर्डिनेंस फॅक्टरीजमध्ये तयार झालेल्या आहेत. त्यातल्या काही महाराष्ट्रातील वरणगाव आणि खडकी ऑर्डिनेंस फॅक्टरीत बनलेल्या आहेत, तर काही मध्यप्रदेशातील खमरिया ऑर्डिनेंस फॅक्टरीत तयार झाल्या आहेत. वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये वेगवेगळ्या काळात बनलेल्या एवढ्या गोळ्या भारसिंगीत कशा पोहोचल्या आणि त्या कोणी आणल्या, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा छडा लावणे हे पोलिसांपुढे आव्हान असेल.
तिसरी बाब म्हणजे, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आलेल्या धमकीनंतर नागपूरच्या सराफ मार्केटमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत सराफ व्यापाऱ्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून हा बंदोबस्त वाढवला गेला.
इतवारी भागातील 8 सराफ व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचे पत्र मिळाले होते. हे पत्र नागपूरच्या खामला भागातून पोस्टाने पाठवले गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याआधी 15 सप्टेंबरलाही राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला धमकीचे पत्र आले होते. 31 ऑक्टोबरला पोस्टाने आलेल्या पत्रात प्रत्येकी 10 लाख रुपये पाठवा, अन्यथा टायगर श्रॉपसारखा जीवानिशी हल्ला करू, अशी धमकी देण्यात आली होती.
याप्रकरणी आता तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी सराफ व्यापाऱ्यांना दिले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.