येवूरच्या बंगल्यातील हॅलोविन पार्टीवर वर्तक नगर पोलिसांचा छापा; 70 हून अधिक जण ताब्यात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाण्यातील येवूर वनक्षेत्रातल्या बंगल्यात रंगलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाचेचा आरोप होत असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील येवूर परिसरात एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या 'हॅलोविन पार्टी'वर वर्तक नगर पोलिसांनी छापा टाकला. येवूर हा भाग निसर्गरम्य आणि संवेदनशील वनक्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पार्टीत 70 हून अधिक तरुण-तरुणी बेकायदा मद्यप्राशन करत होते आणि ई-सिगारेटचे सेवनही करत होते, असे समोर आले आहे. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही पार्टी येवूरमधील आश्रम रोडवरच्या 'लायन्स पार्क' परिसरात सुरेश गडा यांच्या बंगल्यात ठेवण्यात आली होती. पार्टीत शिरण्यासाठी प्रत्येकी 1500 रुपये एन्ट्री फी घेतली गेली होती. अशा पार्ट्यांसाठी आयोजकांकडून सुरेश गडा 50 हजार ते 1 लाख रुपये भाडे घेतात, असा आरोप आहे. पार्टीच्या नावाखाली वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मद्य आणि बंदी असलेल्या ई-सिगारेटचा वापर सुरू होता, असेही सांगितले जात आहे.
या प्रकरणातली सर्वात गंभीर बाब म्हणजे वन विभागाच्या चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांवर होत असलेला लाचखोरीचा आरोप. पार्टीच्या आयोजकाने येवूरच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना 6000 रुपयांची लाच दिली, असा आरोप केला जात आहे.
पार्टीसाठी काही अधिकृत परवानगी लागते का, असे विचारले असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 'हा आमचा भाग आहे, इथे कोणाच्याही परवानगीची गरज नाही', असे सांगून 6000 रुपये घेतल्याची चर्चा सुरू आहे. ही रक्कम अधिकृत पावती देऊन जमा करण्यात आली होती की थेट लाच म्हणून घेतली गेली, हा आता मोठा तपासाचा मुद्दा ठरला आहे.
घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात आयोजक, बंगल्याचे मालक आणि उपस्थित तरुणांची कसून चौकशी सुरू आहे. वन विभागाच्या संशयित कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राखीव वनक्षेत्रात उशिरापर्यंत चालणाऱ्या अशा पार्ट्यांसाठी योग्य परवानग्या घेतल्या होत्या का, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरोखरच 6000 रुपयांची लाच घेऊन बेकायदेशीर पार्टीला मुभा दिली का, असे विचारले जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागात मद्यप्राशन, बंदी असलेल्या ई-सिगारेट आणि मोठ्या आवाजात वाजणारे संगीत यांना जबाबदार कोण, हाही प्रश्न आहे. तसेच वनक्षेत्राचा असा व्यावसायिक गैरवापर झाल्याबद्दल बंगल्याचे मालक सुरेश गडा यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.