दिशा सालियन प्रकरणी सहा वर्षांनी आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण, म्हणाले-कधीच भेट झाली नाही
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर नव्याने दाखल एफआयआरमध्ये नाव आल्यावर आदित्य ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करत भूमिका मांडली.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनी तब्बल सहा वर्षांनंतर या विषयावर तोंड उघडलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात सीबीआय आणि इतर यंत्रणांकडून नव्याने तपास सुरू झाला असून, दाखल झालेल्या नवीन एफआयआरमध्ये आपलं नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सविस्तर पोस्ट करत आपली बाजू मांडली.
आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी लिहिलं की, अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो. मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापोटी आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने काही लोकांकडून गेल्या सहा वर्षांपासून कुठलाही पुरावा किंवा संबंध नसतानाही आपलं नाव या दुर्दैवी घटनेशी जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुठलंही तथ्य किंवा सत्य नसलेलं हे सतत सुरू असलेलं खोटं कॅम्पेन दुर्दैवी असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. टीव्ही चॅनेल्सवर गोंधळ घालून केल्या जाणाऱ्या खोट्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्स यामुळे सत्य बदलणार नाही, असंही त्यांनी ठणकावलं. अधिकृत यंत्रणांनी कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जे लोक चारित्र्यहनन आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने आम्हाला गप्प बसवू शकू असं समजत असतील तो त्यांचा भ्रम आहे, सत्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरूच राहील, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला.
दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. यानंतर अवघ्या काही दिवसांत, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेही गळफास लावून आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनांमध्ये परस्पर संबंध असल्याचा दावा करत विरोधकांकडून सातत्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव जोडत गंभीर आरोप केले होते.
आता मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात नवीन एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंसह अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अभिनेता डिनो मोरिया, सूरज पांचोली तसेच काही माजी पोलीस अधिकारी आणि इतरांचा उल्लेख असल्याची चर्चा आहे. या नव्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली असून, पुढील काळात या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.