दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सहा वर्षांनी CBI चौकशी, वडिलांच्या जबाबात आदित्य ठाकरे, डिनो मोरियांची नावे
बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतर CBIने FIR नोंदवत तपास सुरू केला असून, दिशा सालियनच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात अनेक बड्या नावांचा उल्लेख झाल्याचे वृत्त आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या प्रकरणाला सहा वर्षांनी नवं वळण मिळालं आहे. बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच CBIने या केसमध्ये FIR दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे.
सतीश सालियन यांनी शुक्रवारी CBIच्या मुंबईतील ऑफिसमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेता डिनो मोरिया, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती आणि काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतल्याचं वृत्त आहे. दिशाच्या मृत्यूशी संबंधित पुरावे नष्ट केले गेले किंवा तपासावर दबाव आणला गेला, असा आरोपही त्यांनी केल्याचं समोर आलं आहे. अर्थात हे आरोप खरे आहेत की नाही, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
८ जून २०२० रोजी मालाडमधील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृत्यू आत्महत्या असल्याचं सांगितलं गेलं होतं आणि यात कुठलाही घातपात झाला नसल्याचा निष्कर्ष काढला गेला होता. पण दिशाच्या वडिलांना या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल शंका होती, आणि त्यांनी नव्याने तपास व्हावा अशी मागणी लावून धरली.
याच मागणीसाठी सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर २ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने CBIला FIR नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले, आणि यासाठी वरिष्ठ, अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असंही सांगितलं. मात्र कोर्टाने हेही स्पष्ट केलं की, तपासात पुरेसा आधार मिळेपर्यंत कुणालाही आरोपी समजलं जाऊ नये. हायकोर्टाच्या या आदेशानंतर CBIने मालवणी पोलीस स्टेशनकडून दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित सगळी कागदपत्रं आणि तपासाची नोंद मागवली आहे. मुंबई पोलिसांकडे आधी झालेल्या तपासाची कागदपत्रं CBIकडे सोपवण्याची प्रोसेस सुरू झाली आहे, आणि याच कागदपत्रांच्या आधारे CBI घटनाक्रम पुन्हा तपासणार आहे.
या हाय-प्रोफाइल केसच्या तपासासाठी CBIने वरिष्ठ अधिकारी DSP पुराण कुमार यांची नियुक्ती केली आहे. सतीश सालियन यांचा जबाब नोंदवणं आणि उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करणं ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. याशिवाय घटनास्थळ, आधीचा पोलीस तपास, हाती असलेले पुरावे आणि यात नाव आलेल्या व्यक्तींची भूमिका, या सगळ्याची नव्याने पडताळणी होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे आणि इतर काही व्यक्तींची नावं तक्रारदाराच्या जबाबात आल्यामुळे राजकीय आणि सिनेसृष्टीत चर्चा सुरू झाली आहे. पण CBIचा तपास अजून सुरुवातीच्या टप्प्यात असून, कुणाच्याही विरोधातले आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. तपासात मिळणारे पुरावे आणि जबाब यांच्या आधारेच पुढची कारवाई ठरणार आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या मृत्यूमागचं खरं कारण आणि तक्रारीतल्या आरोपांचं सत्य, हे CBIच्या तपासानंतरच समोर येणार आहे.