डिलिट झालेला व्हॉट्सअप मेसेज वाचायचा आहे? फोनमधील एका सेटिंगने काम सोपे होणार
व्हॉट्सअपवर आलेला मेसेज कोणी लगेच डिलिट केला तर तो पुन्हा वाचता येतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. अँड्रॉईड फोनमधील नोटिफिकेशन हिस्ट्री या फीचरचा वापर करून हे शक्य आहे.
व्हॉट्सअपवर कोणी मेसेज पाठवला आणि आपण तो उघडून वाचायच्या आतच त्या व्यक्तीने "Delete for Everyone" करून टाकला, असा अनुभव अनेकांना येतो. अशा वेळी समोरच्याने नेमकं काय लिहिलं होतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता साहजिकच वाढते. व्हॉट्सअपमध्ये डिलिट झालेला मेसेज परत मिळवण्यासाठी कंपनीने कोणताही थेट पर्याय दिलेला नाही. पण अँड्रॉईड फोनमध्ये आधीपासून असलेल्या एका फीचरचा वापर केला, तर हे काम सोपं होऊ शकतं.
अँड्रॉईड फोनमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री नावाचा एक इन-बिल्ट पर्याय असतो. फोनवर येणाऱ्या सगळ्या अॅप्सच्या नोटिफिकेशन्सचा रेकॉर्ड हे फीचर सेव्ह करून ठेवतं. त्यामुळे कोणी मेसेज पाठवून तो चॅटमधून काढून टाकला, तरी त्या मेसेजचं नोटिफिकेशन फोनच्या हिस्ट्रीमध्ये तसंच राहतं आणि डिलिट झालेला मजकूर अनेकदा तिथे वाचायला मिळतो.
हे फीचर वापरण्यासाठी आधी ते फोनमध्ये सुरू असणं गरजेचं आहे. फोनच्या ब्रँडनुसार सेटिंग करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. सैमसंग वापरणाऱ्यांनी फोनच्या Settings मध्ये जाऊन Notifications वर टॅप करायचं, त्यानंतर Advanced Settings मध्ये जाऊन Notification history हा पर्याय निवडून समोरचा टॉगल ऑन करायचा. इतर अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांनी Settings उघडून Notifications मध्ये जायचं आणि तिथे Notification history वर क्लिक करून Use notification history हा पर्याय ऑन करायचा. सेटिंग शोधताना अडचण आली, तर सेटिंग्जच्या सर्च बॉक्समध्ये Notification history टाईप केलं की हे फीचर पटकन सापडतं.
हे फीचर एकदा सुरू झालं की फोनवर येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशनची नोंद ठेवली जाते. कोणी मेसेज पाठवून तो डिलिट केला असेल, तर Settings, त्यानंतर Notifications आणि मग Notification History मध्ये जाऊन संबंधित मेसेजिंग अॅपचं नाव शोधावं लागतं. मेसेज आला तेव्हा फोनवर नोटिफिकेशन तयार झालं असेल, तर त्याचा काही भाग किंवा संपूर्ण मेसेज तिथे वाचायला मिळू शकतो.
हे फीचर वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मेसेज येण्याआधीच हे फीचर सुरू असणं गरजेचं आहे, अन्यथा डिलिट झालेला मेसेज अजिबात दिसणार नाही. अँड्रॉईड सामान्यपणे फक्त गेल्या चोवीस तासांतील नोटिफिकेशन्सचा डेटा सुरक्षित ठेवतं, त्यामुळे खूप जुने मेसेज याद्वारे शोधता येत नाहीत. एखादी व्हॉट्सअप चॅट म्यूट केलेली असेल आणि त्यावरच्या मेसेजचं नोटिफिकेशन पॉप-अप झालं नसेल, तर त्याची नोंद नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये होत नाही. तसंच मेसेज खूप मोठा असेल, तर नोटिफिकेशन विंडोत दिसणारा तेवढाच मजकूर सेव्ह होतो, त्यामुळे संपूर्ण मेसेज मिळण्याची गॅरंटी नसते.