रात्री उशिरा जेवण, कॅफीनमुळे शहरी भारतीयांच्या मेटाबॉलिक आरोग्यावर परिणाम: आयवाचा अभ्यास
आयवा कंपनीच्या इंडिया वेलनेस इंडेक्स २०२६ या अहवालातून शहरी भारतीयांच्या जीवनशैलीतील सवयींमुळे मेटाबॉलिक आरोग्यावर होणारा परिणाम समोर आला आहे.
शहरी भारतीयांचं मेटाबॉलिक म्हणजे चयापचयाचं आरोग्य फारच चिंताजनक अवस्थेत असल्याचं एका मोठ्या अभ्यासातून समोर आलं आहे. रोजच्या जगण्यातल्या काही सवयींचा त्यांच्या तब्येतीवर आणि एकूण जगण्याच्या दर्जावर सतत विपरीत परिणाम होतोय, असं या अभ्यासात नोंदवण्यात आलं आहे. टच-सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित जगातलं पहिलं मेटाबॉलिक वेलनेस ट्रॅकर बनवणाऱ्या आयवा (EYVA) या कंपनीने हा अभ्यास केला आहे.
आयवाच्या इंडिया वेलनेस इंडेक्स २०२६ या अहवालासाठी ३०,००० हून जास्त प्लॅटफॉर्म युजर्सच्या ३५ लाखांहून जास्त अनामिक आरोग्य नोंदींचं विश्लेषण करण्यात आलं. ज्या नागरिकांचा वेलनेस स्कोअर कमी आहे, त्यांच्यात काही सवयी सारख्याच दिसून आल्या - बराच वेळ बसून करावा लागणारा प्रवास, रात्री उशिरा आणि भरपूर जेवण, जेवणानंतर अजिबात न हलणं, उशिरा कॅफीन घेणं आणि पुरेशी विश्रांती न मिळणं.
अहवालानुसार देशभरात जवळपास ५४ टक्के लोक रात्री ९ नंतर जेवतात. मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण आणखी जास्त आहे. मुंबईत सगळ्यात जास्त उशिरा जेवण होतं - ६४ टक्के लोक रात्री ९:३० नंतर जेवतात, तर दिल्लीत सगळ्यात जास्त प्रमाणात जेवण घेतलं जातं. जे लोक उशिरा जेवतात त्यांची झोपेची गुणवत्ता खराब असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या रक्तातली ग्लुकोजची पातळी नेहमीपेक्षा जास्त भरते, असं या अभ्यासात नोंदवलं गेलं आहे.
याबाबत आयवाचे फाउंडर आणि सीईओ सुनील मधिकटला म्हणाले, "रात्री उशिरा जेवायची सवय देशभर वाढतेय. लांबचा प्रवास हे यामागचं एक मोठं कारण आहे, पण घरातली नोकरी करणारी व्यक्ती उशिरा घरी येते म्हणून पूर्ण कुटुंबाचीच जेवायची वेळ बदलते. रात्री उशिरा भरपूर जेवण, ताण आणि कॅफीनमुळे रात्रभर हार्ट रेट वाढलेला राहतो आणि सकाळी शरीर पूर्ण फ्रेश होत नाही. या स्थितीला आम्ही मेटाबॉलिक हँगओव्हर म्हणतो."
शहरनिहाय आकडेवारी पाहिली तर बरेच फरक दिसतात. मुंबईत ५२ टक्के युजर्स रोजच्या प्रवासासाठी लोकल ट्रेन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात, त्यामुळे त्यांचं चालणं जास्त होतं. पण गर्दीच्या वेळेतल्या टेन्शनमुळे त्यांच्यात हार्ट रेटशी संबंधित निर्देशांक वाढलेले दिसले. दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळ्यातल्या धुरक्यामुळे लोकांच्या बाहेरच्या हालचाली ३० टक्क्यांनी कमी झाल्या, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊन तिथल्या लोकांचा मेटाबॉलिक वेलनेस स्कोअर ६ ते ९ टक्क्यांनी घसरला.
बेंगळुरूमध्ये ४४ टक्के नोकरदारांना कामाच्या दिवशी बराच वेळ बसून प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या रोजच्या हालचाली १८ टक्क्यांनी कमी झाल्या. पण गार्डन किंवा हिरव्या मोकळ्या जागेत वेळ घालवणाऱ्या १० पैकी ७ जणांनी सांगितलं की त्यांची मनःस्थिती आधीपेक्षा जास्त पॉझिटिव्ह झाली. हैदराबादमध्ये ६४ टक्के नोकरदार आणि व्यावसायिक रात्री १० नंतर जेवतात, त्यामुळे तिथे मेटाबॉलिक हँगओव्हरचा पॅटर्न वारंवार दिसला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ग्लुकोजची पातळी व मेटाबॉलिझम अस्थिर राहिल्याचं नोंदवण्यात आलं.
एकाच घरात सगळे एकसारखं जेवण जेवत असले तरी दोन व्यक्तींच्या शरीरावर त्याचा परिणाम वेगळा होतो, हेही अभ्यासात स्पष्ट झालं. त्यामुळे सगळ्यांना लागू पडेल असा एकच डाएट प्लॅन काम करत नाही. मात्र जेवणानंतर थोडी शतपावली करणाऱ्या जवळपास ३७ टक्के युजर्समध्ये ग्लुकोजची पातळी १२ ते १६ टक्क्यांनी जास्त कंट्रोलमध्ये राहिली आणि झोपही चांगली लागली. रोजच्या जगण्यात छोटे सकारात्मक बदल करणाऱ्या युजर्सचा वेलनेस स्कोअर तीन महिन्यांत ८ ते १२ टक्क्यांनी सुधारल्याचं आढळून आलं.