दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड MIVI ने बजेट सेगमेंटमध्ये स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी नवा फोन बाजारात आणला आहे. कंपनीने या स्मार्टफोनला MIVI ONE 5G असं नाव दिलं आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि ज्यांचं बजेट 15 हजार रुपयांच्या आसपास आहे, त्यांच्यासाठी हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.
नवा MIVI ONE 5G तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB असे तीन पर्याय आहेत. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे, 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी 14,999 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने असं सांगितलं आहे की यूपीआयने पेमेंट केल्यास ग्राहकांना 1,000 रुपयांचं इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनची विक्री 8 ऑक्टोबरला रात्री 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
डिस्प्लेच्या बाबतीत या फोनमध्ये 6.75 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनला 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन अधिक स्मूथ वाटतं. फोनच्या डिझाईनमध्ये कंपनीने प्रिमियम लूक आणि प्रिमियम अनुभव देण्यावर भर दिल्याचं सांगितलं जात आहे.
परफॉर्मंससाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 5G प्रोसेसर बसवण्यात आला आहे, आणि त्याला एलपीडीडीआर4एक्स रॅमची जोड देण्यात आली आहे. हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो, त्यामुळे 5G नेटवर्कचा वापर करता येईल.
कॅमेऱ्याच्या बाबतीत फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, त्यातला प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरीच्या बाबतीत या फोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने या डिव्हाईसमध्ये सुपर कॉल हे फीचरही दिलं आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत या फोनमध्ये प्युअर अँड्रॉईड 16 मिळणार आहे.