चिन्मय सुतारची रणजी ट्रॉफीत नागालँडविरुद्ध नाबाद ४०० धावांची खेळी; मुंबई ते मिझोराम प्रवासातून रचला इतिहास
मिझोरामचा फलंदाज चिन्मय सुतार याने प्लेट ग्रुपमधील सामन्यात नागालँडविरुद्ध नाबाद ४०० धावा केल्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात ४०० धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मिझोरामचा फलंदाज चिन्मय सुतार याने रणजी ट्रॉफीत इतिहास रचला आहे. प्लेट ग्रुपमधील सामन्यात नागालँडविरुद्ध त्याने नाबाद ४०० धावांची ऐतिहासिक खेळी केली. मिझोरामकडून खेळताना त्याने ही कामगिरी करून दाखवली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात ४०० धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
हा सामना दिमापूर येथील सोविमा मैदानावर खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मिझोरामने ९ विकेट्स गमावून ५८१ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. एवढी मोठी धावसंख्या उभी राहिली ती चिन्मयच्या तुफानी खेळीमुळे. त्याने ५१७ चेंडूंचा सामना केला आणि त्यात ४६ चौकार व ७ षटकार मारले. ४०० धावा केल्यानंतरही तो नाबाद राहिला.
या खेळीतून चिन्मयने दबावाखाली फलंदाजीचे कौशल्य तर दाखवलेच, पण भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या विक्रमांमध्ये आपले नावही नोंदवले. याआधी महाराष्ट्राचे बी. बी. निंबाळकर यांनी १९४८-४९ च्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना काठियावाडविरुद्ध नाबाद ४४३ धावा केल्या होत्या.
आता चिन्मय नेमका कोण आहे, ते पाहू. त्याचा जन्म मुंबईत झाला. तो वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळतो आहे. त्याचे वडील राजेश सुतार हेही प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. त्यांनी मुंबईसाठी अनेक मोठ्या खेळी केल्या असून सध्या ते प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. १९९८ मध्ये राजेश सुतार यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत डावाची सुरुवात केली होती. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे झालेल्या त्या सामन्यात मुंबईने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. सुरुवातीला राजेश सुतार यांनीच आपल्या मुलाला प्रशिक्षण दिले.
चिन्मय या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत मुंबई संघाचा भाग होता. चालू हंगामापूर्वी त्याने मिझोरामकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान मणिपूरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने मिझोरामकडून पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात ३५ आणि ९९ धावा केल्या. फक्त एका धावेने त्याचे शतक हुकले. मात्र, नागालँडविरुद्धच्या सामन्यात ४०० धावा करून त्याने त्याची भरपाई केली.