भारतात फेरारीच्या सुपरकार्सना वाढती मागणी, कंपनी गाड्यांचा पुरवठा वाढवण्याच्या तयारीत
इटलीची लक्झरी कार कंपनी फेरारी भारतातील मागणी पाहून जास्त गाड्या देण्याची तयारी दाखवत आहे. 2026 च्या जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांत 45 गाड्यांची नोंदणी झाली आहे.
इटलीची प्रसिद्ध लक्झरी कार कंपनी फेरारी भारतातील वाढत्या मागणीमुळे आपल्या सुपरकार्सचा पुरवठा वाढवण्याच्या तयारीत आहे. महागड्या स्पोर्ट्स कार्सची आवड असलेल्या भारतीय कस्टमर्सची संख्या वाढत आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे आयात शुल्क कमी होण्याची अपेक्षा आहे, तिचीही या मागणीला चालना मिळत आहे. कंपनीने मागणीनुसार भारताला जास्त गाड्या देण्याची तयारी दाखवली आहे.
नोंदणीच्या आकडेवारीतही ही वाढ दिसते. 2025 मध्ये भारतात कंपनीच्या 45 गाड्यांची नोंदणी झाली. ही संख्या 2024 मधील 35 गाड्यांच्या तुलनेत 28.6% जास्त होती. आता 2026 च्या जानेवारी ते सप्टेंबर, म्हणजे फक्त 9 महिन्यांत, पुन्हा 45 गाड्यांची नोंदणी झाली आहे. म्हणजेच मागच्या पूर्ण वर्षात जेवढ्या गाड्यांची नोंदणी झाली होती, तो आकडा कंपनीने यंदा 9 महिन्यांतच गाठला.
फेरारीच्या फार ईस्ट आणि मिडल ईस्ट विभागाचे अध्यक्ष फ्रान्सेस्को बियांची यांनी स्पष्ट केले की, पुरवठा वाढवण्याचा निर्णय मागणीवर अवलंबून असेल. फेरारी जगभरातील गाड्यांचे प्रोडक्शन आणि वेगवेगळ्या देशांना होणारा पुरवठा नियोजन करून ठरवते. त्यामुळे भारताला किती जास्त गाड्या मिळतील आणि हे नेमके कधीपासून सुरू होईल, याबद्दल कंपनीने अजूनपर्यंत ठोस आकडे किंवा तारीख सांगितलेली नाही.
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारावरही कंपनीचे लक्ष आहे. या करारामुळे पात्र युरोपियन कार्सवरील आयात शुल्क टप्प्याटप्प्याने कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम भविष्यात फेरारीच्या काही मॉडेल्सच्या किमतींवर होऊ शकतो. मात्र हा करार अजून लागू झालेला नाही, त्यामुळे फेरारीच्या भारतातील किमती किती कमी होतील, हे आत्ताच निश्चित सांगता येत नाही. अंतिम परिणाम शुल्कातील तरतुदी आणि कंपनीचे किंमत धोरण यावर अवलंबून असेल.
कंपनी भारतातील विक्री आणि सर्व्हिस नेटवर्कही वाढवणार आहे. सध्या दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथे फेरारीची शोरूम आणि सर्व्हिस सुविधा आहेत. अहमदाबाद आणि चेन्नई येथेही नवीन सुविधा सुरू करण्याची योजना आहे आणि 2026 च्या अखेरपर्यंत त्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 12Cilindri, Purosangue आणि Amalfi अशा मॉडेल्सबद्दल संभाव्य कस्टमर्स चौकशी करत आहेत, असेही कंपनीने सांगितले आहे.
जागतिक पातळीवर 2025 मध्ये फेरारीच्या विक्रीत किंचित घट झाली होती. तरीही भारतात वाढणारी मागणी, आयात शुल्कात होऊ शकणारी संभाव्य कपात आणि नवीन शोरूम्स यामुळे हा मार्केट कंपनीसाठी महत्त्वाचा ठरत आहे. आपली खास ओळख आणि गाड्यांची मर्यादित उपलब्धता कायम ठेवून भारतातील उपस्थिती मजबूत करण्याचा फेरारीचा प्रयत्न आहे.