शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:52 IST

चंद्रपुरात पतसंस्थेच्या सीईओसह १२ जणांवर गुन्हा, ८.६० कोटींच्या अफरातफरीची तक्रार

यहोवा यिरे पतसंस्थेत १३३१ गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

चंद्रपुरात पतसंस्थेच्या सीईओसह १२ जणांवर गुन्हा, ८.६० कोटींच्या अफरातफरीची तक्रार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपुरातील यहोवा यिरे पतसंस्थेच्या फसवणूक प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेचे सीईओ आणि संचालक मंडळातील १२ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे.

वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील चंद्रकिशोर नामदेव मांडवकर (वय ५२, रा. आनंदवन चौक, द्वारकानगरी, बोर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांनी ही लेखी तक्रार दिली. एकूण १३३१ गुंतवणूकदारांची रक्कम अडकल्याचा त्यांचा दावा आहे. मांडवकर यांनी स्वतः विविध मुदत ठेवी आणि कमिशन मिळून ८ लाख ८४ हजार १७४ रुपये या संस्थेत गुंतवले होते.

या तक्रारीवरून पोलिसांनी यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सीईओ रमेश शामराव बोरकुटे, अध्यक्ष सचिन हरिदास पानघाटे, उपाध्यक्ष एलीजा रमेश बोरकुटे, मॅनेजर तथा संचालक अपेक्षा स्नेहदीप जोब, संचालक अतुल सोपन बनसोड, दुर्गा गौरंग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी ऋषी वासेकर, तेजस्विता अनित्य लोखंडे, प्रीती विनोद भिलकर, वैभव गुरुदेव चौधरी आणि विकास देवराव दुधबळे यांच्यावर कारवाई केली आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी कट रचून २६ डिसेंबर २०२३ रोजी चंद्रपूर शहरातील सिडिसीसी बँकेच्या मागे, वरोरा रोड येथे ही पतसंस्था सुरू केली. सर्वसामान्य लोकांना आकर्षित करण्यासाठी संस्थेने वेगवेगळ्या योजना काढल्या होत्या. त्यात वार्षिक ४ टक्के व्याजाचे बचत खाते, ९.७५ टक्के व्याजाची मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट), टीडीएस टाईम डिपॉझिट योजना, युवा बचत धन योजना, मासिक बचत योजना (एमआयएस), तसेच महिला व बालकल्याण डोळ्यांसमोर ठेवून कन्यादान योजना आणि दैनिक ठेव योजना यांचा समावेश होता.

या योजना चंद्रपूर जिल्ह्यात घराघरांत पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने एजंट, फिल्ड ऑफिसर आणि एरिया ऑफिसर नेमण्यात आले होते. प्रत्येक तालुका स्तरावर कस्टमर सर्व्हिस पॉईंट (सीएसपी) सुरू करून तिथे नागरिकांकडून रकमा घेतल्या जात होत्या आणि गरजूंना कर्जवाटपही केले जात होते.

मात्र मार्च २०२६ मध्ये अनेक गुंतवणूकदारांच्या ठेवींची मुदत (मॅच्युरिटी) संपली, तरीही त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. संस्थेचे कर्मचारी आणि मॅनेजर यांनी टाळाटाळ करत फक्त पुढच्या तारखा दिल्या. पीडित नागरिकांनी आणि खुद्द तक्रारदाराने सीईओ रमेश बोरकुटे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला, तेव्हा त्यांनी सर्वांचे पैसे परत करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत मागितली होती. पण त्या मुदतीतही गुंतवणूकदारांना एक रुपयाही परत मिळाला नाही.

संचालक मंडळाने आपसात संगनमत करून गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि एकूण ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची अफरातफर करून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम, १९९९ मधील कलम ३ सह भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५), ३१६(२), ३१६(५) आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे करत आहेत. एवढ्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ