बंगाली कॅम्प चौकात रोज संध्याकाळी रस्ता अरुंद, प्रशासनाला २० निवेदने देऊनही कारवाई नाही
चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौकात वाईन शॉप आणि बारसमोरील गर्दीमुळे रोज संध्याकाळी रस्ता अरुंद होतो. भाजपचे जिल्हा महामंत्री मनोज पॉल यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई झालेली नाही.
चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौक हा अपघाताचा ब्लॅकस्पॉट बनला आहे आणि याला कारण आहे रोज संध्याकाळी याच चौकात होणारे अतिक्रमण. मूल आणि बल्लारपूर या दोन तालुक्यांना जोडणारा हा मार्ग शहरासाठी महत्त्वाचा आहे, कारण याच रस्त्यावरून रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. याच मार्गावर एक वाईन शॉप आणि बार आहे. सूर्य मावळला की या दुकानासमोर गर्दी जमू लागते आणि शहराला जोडणारा ४० फुटांचा रस्ता अवघ्या १५ फुटांवर येऊन ठेपतो. रस्त्याची रुंदी अशी अचानक कमी झाल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते.
या चौकात याआधी अनेकांचा अपघातात जीव गेला आहे, तरीही वाईन शॉप आणि बार चालकांनी आपली दुकानदारी थांबवलेली नाही. रोज संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणारी ही गर्दी हळूहळू वाढत जाते आणि काही वेळातच पूर्ण रस्ता व्यापून टाकते. जड वाहने, बस, चारचाकी आणि दुचाकी चालकांना या गर्दीतून वाट काढण्यासाठी जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांचीही यामुळे मोठी अडचण होते, कारण चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही.
याहून धक्कादायक बाब म्हणजे हे सगळे घडते ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ च्या कार्यालयाच्या दारातच. वाईन शॉपमधून दारू विकत घेतल्यावर लोक लगतच्या मोकळ्या जागेत बसून उघड्यावरच दारू पितात, आणि हे सगळे प्रशासनाच्याच उंबरठ्यावर, म्हणजे प्रशासनाच्या नजरेसमोरच घडते.
भाजपचे जिल्हा महामंत्री मनोज पॉल यांनी या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, उत्पादन शुल्क विभाग, महानगरपालिका आणि वाहतूक नियंत्रण विभाग या सर्व यंत्रणांकडे तब्बल २० हून अधिक निवेदने दिली आहेत. एवढी निवेदने देऊनही प्रत्येक ठिकाणाहून प्रशासनाने कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली, असे मनोज पॉल यांचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त झालेले मनोज पॉल आता थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून त्यांनी लवकरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वाईन शॉप आणि बार चालक प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत, हे यातून स्पष्ट झाले आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी या व्यावसायिकांवर कारवाई करण्यास का धजावत नाहीत, हा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे. दरम्यान, या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होत असल्याने अपघातांची शक्यता वाढतच चालल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.