बोरीवलीच्या भगवती रुग्णालयात आवास अधिकारी पदासाठी थेट मुलाखत, ३ जागा भरणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्री. हरिलाल भगवती रुग्णालयात ३ रिक्त पदांसाठी २ नोव्हेंबर २०२६ रोजी थेट मुलाखत होणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अंतर्गत येणाऱ्या श्री. हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात, बोरीवली (प.) येथे 'आवास अधिकारी' पदाच्या जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीतून एकूण ३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मुंबईत एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांसाठी ही नोकरीची मोठी संधी आहे.
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (Maharashtra Medical Council) त्यांची कायमस्वरूपी नोंदणी असणे गरजेचे आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे लागेल, आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना मूळ वेतन ६,६०० रुपये, ३,३०० रुपये डी.पी., नियमांनुसार महागाई भत्ता आणि २७,००० रुपये SAC असे सगळे मिळून दरमहा वेतन दिले जाईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. येताना पासपोर्ट आकाराचा फोटो लावलेला अर्ज, बायोडाटा, शैक्षणिक पात्रतेची आणि अनुभवाची प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती सोबत आणाव्यात.
मुलाखत आणि नोंदणीचे ठिकाण 'प्रमुख वैद्यकीय अधिकारी (CMO) कार्यालय, पहिला माळा, खोली क्र. २६, श्री. हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बोरीवली (प.), मुंबई - ४००१०३' हे आहे. नोंदणी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते १०:३० या वेळेत होईल. त्यानंतर मुलाखत सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या वेळेत पार पडेल. नोंदणीची वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना मुलाखतीत सहभागी होता येणार नाही.
या पदावरील नियुक्तीचा कालावधी नियुक्तीच्या दिनांकापासून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत असेल. ही पदे महानगरपालिकेची नियमित पदे नाहीत. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना पालिकेचे नियमित कर्मचारी मानले जाणार नाही.
नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना १०,००० रुपयांची अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरावी लागेल. संपूर्ण सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत केली जाईल. याबद्दलची अधिक माहिती आणि अटी रुग्णालयाकडे तसेच अधिकृत जाहिरातीत पाहता येतील.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.