BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
बीएमडब्ल्यू मोटोराडने आपल्या नव्या नेकेड स्ट्रीटफायटर बाइकचा पहिला टीझर जाहीर केला असून तिचा ग्लोबल डेब्यू 1 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.
बीएमडब्ल्यू मोटोराड कंपनीने आपल्या आगामी नेकेड स्ट्रीटफायटर बाइक F 450 R चा पहिला टीझर समोर आणला आहे. या बाइकमुळे कंपनीच्या 420cc इंजिन प्लॅटफॉर्मचा विस्तार होणार असून, या प्लॅटफॉर्मवरची ही दुसरी बाइक ठरणार आहे. याआधी F 450 GS ही या प्लॅटफॉर्मवरची पहिली बाइक आली होती, आणि आता तिच्यानंतर F 450 R हे नवे मॉडेल याच प्लॅटफॉर्मवर तयार केले जात आहे. F 450 R चा अधिकृत ग्लोबल डेब्यू 1 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.
ही बाइक भारतात टीव्हीएसच्या प्रोडक्शन प्रोजेक्टमध्ये तयार केली जाणार आहे. इथून युरोपातील वेगवेगळ्या देशांमध्ये तिची एक्स्पोर्टही होऊ शकते, म्हणजेच भारतात बनणारी ही बाइक जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचणार आहे. जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये बाइकचा आक्रमक आणि स्पोर्टी अवतार दिसतो. मस्क्युलर फ्युल टँक, धारदार टँक एक्स्टेंशन आणि उंच उचललेला रिअर प्रोफाइल यामुळे बाइकला खणखणीत स्ट्रीटफायटर लूक मिळाला आहे. टीझरमध्ये अंडरबेली एक्झॉस्टचीही झलक दिसते.
नव्या F 450 R च्या अंडरपिनिंगमध्ये म्हणजेच बाइकच्या मूळ चेसिस आणि यांत्रिक रचनेत काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे आणि मागे 17-इंच अलॉय व्हील्स आणि रोड-बायस्ड टायर्स मिळू शकतात, तर दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स दिले जाण्याची शक्यता आहे. फीचर्सच्या बाबतीत F 450 GS प्रमाणेच 6.5-इंच TFT डिस्प्ले आणि मल्टीकंट्रोलर मिळू शकतो. यात Pure Ride Screen आणि Sport Screen असे दोन डिस्प्ले मोडही असतील असा अंदाज आहे.
इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत Rain, Road, Enduro आणि Enduro Pro असे राइडिंग मोड्स मिळू शकतात. याशिवाय व्हीली कंट्रोल, रिअर-व्हील ABS, ABS Pro, Dynamic Brake Control, Dynamic Traction Control आणि Engine Drag Torque Control यांसारखी सुरक्षा आणि नियंत्रणासाठीची फीचर्सही मिळण्याची शक्यता आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये Easy Ride Clutch आणि Shift Assistant Pro सारखी सुविधाही दिली जाऊ शकते.
पॉवरट्रेनसाठी F 450 GS प्रमाणेच 420cc ट्विन-सिलेंडर इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 8750 rpm वर 47 bhp पॉवर आणि 6750 rpm वर 43 Nm टॉर्क देऊ शकते. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स जोडला जाणार आहे. भारतात या बाइकची एक्स-शोरूम किंमत 4.50 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे. भारतीय बाजारपेठेत या बाइकची थेट टक्कर अप्रिलिया ट्युओनो 457 आणि केटीएम 390 ड्यूक R या बाइक्सशी होणार आहे.