शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

भारताचा विक्रमी सहावा विजय, जपानला 4-1 ने हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

भारताचा विक्रमी सहावा विजय, जपानला 4-1 ने हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

तिसऱ्याच मिनिटाला मागे पडूनही भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात जपानचा 4-1 असा पराभव केला आणि सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले.

भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा 4-1 असा पराभव केला आणि विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयामुळे भारताने सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. यापूर्वी भारताने 2011, 2016, 2018, 2023 आणि 2024 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

ऑलिम्पियन बलबीर सिंग सीनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम लढतीची सुरुवात मात्र भारतासाठी चांगली झाली नाही. तिसऱ्याच मिनिटाला जपानच्या काझुमासा मात्सुमोतो याने मैदानी गोल करून जपानला आघाडी मिळवून दिली. टोमहॉक फटक्यावर केलेल्या त्या अप्रतिम गोलने भारतीय संघाला धक्का बसला. पहिल्या सत्रात भारताला एकही गोल करता आला नाही.

20 व्या मिनिटाला जपानला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र भारताच्या बचावफळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. या बचावफळीत जरमनप्रीत सिंगने भक्कम कामगिरी केली. मध्यंतरापर्यंत भारत 0-1 असा पिछाडीवर होता, पण दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने सामन्याचे चित्रच पालटले.

33 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र कर्णधार हरमनप्रीतसिंग याचा फटका जपानचा गोलरक्षक किशो कुरोदा याने अडवला. 39 व्या मिनिटाला जपानलाही पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण शोता यामादा याचा प्रयत्न अपयशी ठरला.

त्यानंतर भारतीय संघाने जपानच्या बचावफळीवर सतत दबाव कायम ठेवला. 42 व्या मिनिटाला भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यापैकी एका संधीवर आदित्य अर्जुन लालागे याच्या पासवर शिलानंद लाकडा याने रिबाउंडवर गोल केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

48 व्या मिनिटाला हार्दिकच्या अचूक पासवर दिलप्रीत सिंगने रिव्हर्स हिटने गोल केला आणि भारताला 2-1 अशी आघाडी मिळाली. आघाडी मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी वाढला.

53 व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची आघाडी 3-1 अशी केली. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात विवेक सागर प्रसाद याने सर्कलच्या वरून जोरदार फटका मारत चौथा गोल नोंदवला. अखेरच्या क्षणी जपानला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र कर्णधार राइकी फुजिशिमा याचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. अखेर भारताने 4-1 असा दणदणीत विजय मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ