बिटचॅट भारतातील ॲप स्टोअरवरून हटवले; केंद्र सरकारच्या मंत्रालयाच्या निर्देशानुसार ॲपलचा निर्णय
जॅक डोर्सी यांचे मेसेजिंग ॲप बिटचॅट ॲपलने भारतातील ॲप स्टोअरवरून हटवले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
जॅक डोर्सी यांचे मेसेजिंग ॲप बिटचॅट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे टेक कंपनी ॲपलने हे ॲप भारतातील ॲप स्टोअरवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निर्देशानुसार उचलण्यात आले आहे.
डोर्सी यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या एक्स अकाऊंटवर ॲपलने पाठवलेल्या एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात ॲपलच्या ॲप रिव्ह्यु टीमने सांगितले आहे की, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मागणीनुसार बिटचॅट भारताच्या ॲप स्टोअरवरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ॲपलच्या म्हणण्यानुसार, भारतात बेकायदेशीर मानल्या जाणाऱ्या मजकुराचा हवाला देत सरकारने हे ॲप देशात उपलब्ध करू नये, असे निर्देश दिले होते.
ॲपलने स्पष्ट केले आहे की बिटचॅट दुसऱ्या देशांमध्ये उपलब्ध राहणार आहे. मात्र भारतातील ॲप स्टोअरवरून हे ॲप आता हटवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर भारतात या ॲपचे टेस्टफ्लाईट वर्जनही वापरता येणार नाही. टेस्टफ्लाईटचा वापर ॲपच्या बीटा वर्जनची चाचणी करण्यासाठी केला जातो. ॲपलच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयाने आयटी ॲक्टच्या सेक्शन 69 ए अंतर्गत बिटचॅट भारतातील ॲप स्टोअरवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
ट्विटरचे को-फाऊंडर जॅक डोर्सी यांनी इंटरनेटशिवाय मेसेज पाठवता येण्याच्या सुविधेसह मेसेजिंग ॲप बिटचॅट लाँच केले होते. या ॲपची खासियत अशी की, आजूबाजूला उपलब्ध असलेले डिव्हाईस ब्लूटूथ नेटवर्कच्या मदतीने एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. मध्यंतरी हे ॲप मोठ्या प्रमाणात चर्चेत होते.
बिटचॅट इतर सामान्य मेसेजिंग ॲपपेक्षा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने चालते. त्यासाठी इंटरनेट कनेक्शनवर किंवा कोणत्याही मध्यवर्ती सर्व्हरवर अवलंबून राहावे लागत नाही. हे ॲप ब्लूटूथ आधारित मेश नेटवर्किंग वापरते. त्यामुळे आजूबाजूचे डिव्हाईस एकमेकांशी कनेक्ट होऊन मेसेज पुढे पाठवू शकतात.
जुलै महिन्यात जंतर मंतर येथे सीजेपीचे आंदोलन झाले होते. त्या वेळी इंटरनेट बंद असताना आंदोलनकर्त्यांनी बिटचॅटच्या मदतीने एकमेकांशी संपर्क टिकवून ठेवला. त्यामुळेच हे ॲप यापूर्वीही सरकारच्या निगराणीखाली आले होते, पण नंतर ते पुन्हा उपलब्ध झाले होते.
आता 2 ऑक्टोबर रोजी जंतर मंतर परिसरात 1.5 किलोमीटर क्षेत्रात 12 तास इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. तसेच दिल्ली आणि मुंबईत सीजेपीतर्फे निदर्शने झाली. त्यानंतर ॲपलने आता भारतीय ॲप स्टोअरवरून बिटचॅट हटवण्याचा निर्णय घेतला आहे.