शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

भद्रावतीजवळ चार गावांच्या सीमेवर गोंड गोवारी जमातीची गायगोधन व ढाल पूजा

कल्चर PT24 टीम

निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डीच्या सीमेवर बलिप्रतिपदेला आदिवासी गोंड गोवारी जमात गायगोधन व ढाल पूजा करते. यंदा ही पूजा मंगळवारी आहे.

भद्रावती तालुक्यातील निंबाळा, घोट, हेटी आणि चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गायगोधन (गोवर्धन पूजा) आणि ढाल पूजा केली जाते. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेली ही पूजा आदिवासी गोंड गोवारी जमात आजही तितक्याच श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करते. यंदा मंगळवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

आजूबाजूच्या सुमारे १० ते १२ गावांतून लोक या पूजेला येतात. चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, मानोरा, मोहबाळा आणि इतर गावांतील कोपाल म्हणजे गायी राखणारे आपल्या गायी पूजेसाठी इथे घेऊन येतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा अंदाजे चारशे वर्षांपेक्षा जुनी आहे आणि आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे. गायी राखणे हा गोंड गोवारी जमातीचा पारंपरिक व्यवसाय असल्याने हे लोक गायींची पूजा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

दिवाळीच्या चौथ्या दिवशी, म्हणजे बलिप्रतिपदेला, हा उत्सव होतो. सकाळी आधी घरी गायींची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनिक पूजेसाठी गायींना गायगोधनाच्या पटांगणावर आणले जाते.

या पटांगणावर साधारण पंचवीस ते तीस टोपले शेणापासून एक मोठी भुरसी तयार केली जाते. गायगोधन पूजेत या भुरसीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भुरसीत एक अंडे आणि कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवले जाते. पिलाचे धड शेणात दाबलेले असते आणि मानेचा भाग उघडा ठेवला जातो. अंडे आणि पिल्लू यांच्याभोवती अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे कुंपण घातले जाते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात. त्यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळली जाते. सुवासिनीची ओटी भरतात, तशी खण आणि नारळाने भुरसीची ओटी भरली जाते.

याच वेळी जमातीतील लोक आपल्या दैवताचे प्रतीक असलेल्या ढालींचे पूजन करतात. वीस ते पंचवीस फूट लांब काठीवर लाकडी पाटा बसवून ढाल तयार केली जाते. त्यातली एक ढाल चार मुखी असते. ती माता रायताड जंगो हिचे, म्हणजे स्त्री रूपाचे प्रतीक आहे. दुसरी ढाल दोन मुखी असते. ती धर्मगुरू पहांदि पारी कुपार लिंगो यांचे, म्हणजे पुरुष रूपाचे प्रतीक आहे. या ढालींना (सल्ला व गांगरा) असे म्हणतात आणि जंगो लिंगो लाठी गोंगो असेही म्हटले जाते. आश्विन दशमीला दोन्ही ढालींची गोंगो (पूजा) करून आखरावर, जिथे गायगोधन तयार केले जाते, तिथे खिल्ला मुठवा पेन याची पूजा केली जाते. आजच्या दिवसापासून देव माई हा मुठपूजेचा सण येईपर्यंत या दोन्ही ढालींची मानता केली जाते.

जमातीच्या प्रथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या आधीच्या दिवशी महिषासुर (बोदालपेन)/भेसासुर, खैरदाई/मातामाय, ठाकूर देव या देवदेवतांची आणि पेनकारण (उतरण) केलेल्या पूर्वजांची मुठपूजा केली जाते. गावातील गायींना गोधनावरून चालवून खिल्ला मुठवा देवाचे दर्शन घडवण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आली आहे, असे सांगितले जाते.

त्यानंतर गायगोधन पूजा सुरू होते. प्रथेनुसार आधी चारही गावांच्या शिवारांची (सीमेची) आणि शिवारातील देवांची पूजा होते. या पूजेला शिव बांधणे असे म्हणतात. मग पटांगणाशेजारी असलेल्या वाघोबाच्या मूर्तीची पूजा केली जाते. वाघोबा हे या जमातीचे आराध्य दैवत आहे. आदिवासी परंपरेनुसार पूजा करून आणि नारळ फोडून भुरसीची पूजा होते. त्यानंतर अंडे व जिवंत पिल्लू असलेल्या भुरसीवरून गायींचा कळप सोडला जातो. नंतर पिल्लू आणि अंडे बाहेर काढले जाते. ते दोन्ही सुरक्षित असतात. त्यांना इजा होऊच शकत नाही, असा इथल्या लोकांचा दावा आहे.

जमातीचे आणि या पूजेचे अस्तित्व कायम राहावे म्हणून दरवर्षी बलिप्रतिपदेला ही पूजा आयोजित केली जाते. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गावपातळीवर सामूहिक पद्धतीने गायगोधन व ढाल पूजन होते.

अनुसूचित जमातींच्या यादीत क्रमांक १८ वर असलेल्या गोंड गोवारी जमातीच्या प्रथांची माहिती लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना व्हावी, असे आदिवासी गोंड गोवारी संस्कृती व कल्याण मंडळ, जिल्हा चंद्रपूरचे उपाध्यक्ष विलास राऊत यांनी म्हटले आहे. अनुसूचित जमातीचे लाभ, प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी अधिकाऱ्यांनी या सांस्कृतिक वारशाचे आणि परंपरेचे अवलोकन करून मार्ग सोपा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ