बांदेकरांच्या प्रोडक्शनवरून होणाऱ्या टोमण्यांना पूजा बिरारीचे उत्तर, ऑडिशनशिवाय काम नाही
लग्नानंतर काम सहज मिळेल, या लोकांच्या समजावर अभिनेत्री पूजा बिरारीने पहिल्यांदाच मोकळेपणाने भूमिका मांडली आहे.
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये पूजा बिरारीचे नाव आवर्जून घेतले जाते. तिचा निरागस चेहरा, बोलके डोळे आणि हसरा चेहरा प्रेक्षकांना नेहमीच आवडत आला आहे. काही महिन्यांपूर्वी तिने महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्याशी लग्न केले.
लग्नानंतर पूजा बांदेकरांच्या घरात आली आणि सगळे चित्रच बदलले. सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर दोघेही सुनेचे कौतुक करतात. मुलाखतीत असो किंवा एखाद्या कार्यक्रमात, दोघे पूजाबद्दल भरभरून बोलतात. पूजाही त्या घरात पूर्णपणे मिसळून गेली आहे. मात्र लग्नानंतर तिला ट्रोल केले जात आहे आणि लोक आता तिच्या कामावरून नावे ठेवत आहेत.
लग्न झाल्यापासून लोकांना वाटू लागले की आता पूजाला कसलेच टेन्शन नाही. बांदेकरांचे एवढे मोठे प्रोडक्शन आहे, त्यांची ओळख आहे, त्यामुळे तिला लगेच काम मिळेल. ऑडिशन द्यायची गरजच नाही, थेट मालिकेत घेतील, असे लोक म्हणतात. सेटवरही तिला लोक म्हणायचे, "तुला आता काय टेन्शन आहे?" या सगळ्या ट्रोलिंगवर पूजाने पहिल्यांदाच मनमोकळे उत्तर दिले आहे. 'इट्स मज्जा'ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने हे सगळे सांगितले.
पूजा म्हणाली, "हे मला सेटवरही जाणवले आहे. लोक म्हणतात तुला काय टेन्शन आहे. बांदेकरांचे एवढे मोठे नाव आहे, त्यांचे प्रोडक्शन हाऊस असल्याने तुला कुठेही ऑडिशन देण्याची गरज नाही. कलाकारांना वाटते की ही प्रोडक्शनच्या घरची सून आहे, म्हणजे हिला लगेच काम मिळेल. पण प्रोडक्शनवाल्यांचे म्हणणे वेगळे असते. ते म्हणतात हे ठरवणारे आम्ही नाही. चॅनलचेही मत असते. कॅरेक्टर कसे आहे, त्यात कोण बसते हे सगळे बघून ठरते. कोणी कोणाला नाव बघून घेऊ शकत नाही. हा फक्त लोकांचा समज आहे."
ती पुढे म्हणाली की उद्या तिच्याच घरच्या प्रोडक्शनमध्ये ऑडिशन असेल, तरी ती अगदी प्रोफेशनल कलाकारासारखी जाऊन ऑडिशन देईल. "मलाही त्या ऑडिशनला पोटात गोळा येईल. माझे नीट होतेय ना? जमतेय ना? हे टेन्शन मलाही येणारच. आणि मला एक गोष्ट पक्की माहिती आहे की मला तिथे झुकते माप मिळणार नाही. उलट जबाबदारी जास्त असेल. मलाही असे वाटते की आपल्या प्रोडक्शनचे काम माझ्यामुळे खराब व्हायला नको. मी त्या भूमिकेसाठी योग्य असेन तर ठीक आहे, नाहीतर मला ते काम मिळणार नाही. कुठेही बळजबरी चालत नाही. आणि जरी केली तरी त्याला शेवट असतोच."
पूजा असेही म्हणाली, "शेवटी आपल्याला आरशात बघून स्वतःलाच उत्तर द्यावे लागते. आमच्या घरात या बाबतीत आम्ही खूप प्रोफेशनल आहोत. एक गोष्ट मात्र नक्की, मला मार्गदर्शन खूप चांगले मिळते. त्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे."
पूजाच्या बोलण्यातून एकच कळते की बांदेकरांचे घर एक असले, तरी कामाच्या बाबतीत ते सगळे प्रोफेशनल आहेत. घरात सून आहे म्हणून मालिकेत लगेच घेतले जाईल, असे काही होत नाही. काम मिळवण्यासाठी तिलाही ऑडिशन द्यावी लागते आणि मेहनत करावी लागते. ट्रोल करणाऱ्यांना तिने अगदी शांतपणे आणि समजूतदारपणे उत्तर दिले आहे. लग्न झाले म्हणजे करिअर सोपे झाले असे नाही, तर जबाबदारी आणखी वाढली आहे, हेच तिला सांगायचे होते.