मोदींच्या हस्ते 12 फलोत्पादन क्लस्टर्सना सुरुवात, नाशिकच्या भाजीपाला क्लस्टरची जबाबदारी प्राइम फ्रेशकडे
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमातील 12 क्लस्टर्सचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. नाशिकच्या क्लस्टरसाठी सुमारे 124 कोटी रुपयांची गुंतवणूक आखली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथून देशभरातील 12 फलोत्पादन क्लस्टर्सच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या (NHB) 'क्लस्टर विकास कार्यक्रमा'अंतर्गत या क्लस्टर्सना मंजुरी मिळाली होती. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.
या 12 क्लस्टर्सच्या माध्यमातून देशभरातील 1.46 लाख हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार आहे. त्याचा थेट फायदा 1.3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या अभियानात नाशिक पेरी अर्बन (Peri-Urban) भाजीपाला क्लस्टरसाठी प्राइम फ्रेश लिमिटेड या कंपनीची अंमलबजावणी करणारी संस्था (Implementing Agency) म्हणून निवड झाली आहे. ही कंपनी फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स सप्लाय चेनमध्ये काम करते. कंपनीने 15 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळासोबत अनुदान करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
त्यानंतर 30 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे येथे एक विशेष कार्यक्रम झाला. स्थानिक शेतकरी आणि इतर भागधारक या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय शुभारंभाशी जोडले गेले.
सविस्तर प्रकल्प अहवालानुसार नाशिक क्लस्टरसाठी सुमारे 124 कोटी रुपयांची गुंतवणूक आखली आहे. त्यात शेतकरी पातळीवरचे उपक्रम आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. उत्पादन, एकत्रीकरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, कोल्ड-चेन, प्रक्रिया आणि संघटित बाजारपेठ यांना जोडणारी एकात्मिक कृषी परिसंस्था यातून उभी केली जाईल.
पायाभूत सुविधांमध्ये 2 संकलन आणि एकत्रीकरण केंद्रे तसेच 1 एकात्मिक पॅकहाऊस असेल. 6000 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड-स्टोरेज आणि 3000 मेट्रिक टन क्षमतेचे फ्रोजन-स्टोरेज उभारले जाईल. शेतकऱ्यांसाठी 14 फार्म-गेट पॅकहाऊस आणि 10 वातानुकूलित वाहने मिळणार आहेत.
प्रक्रिया उद्योगात भाजीपाला फ्रीझिंग, डिहायड्रेशन आणि व्हॅल्यू-ॲडिशन (मूल्यवर्धन) सुविधा असतील. तंत्रज्ञानाच्या बाजूला गुणवत्ता नियंत्रण प्रणाली, डिजिटल ट्रॅसेबिलिटी, फार्म-मॅनेजमेंट तंत्रज्ञान आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.
या प्रकल्पांतर्गत 10,000 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष शेतीचे उपक्रम राबवले जातील. सुमारे 11,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाचा लाभ मिळेल. प्राइम फ्रेश कंपनी शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे, आधुनिक शेती पद्धती, थेट बाजारपेठेशी जोडणी आणि तांत्रिक मदत देणार आहे. त्यामुळे शेतमालाची नासाडी कमी होऊन उत्पादनाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले आहे. येत्या 2 वर्षांत हे नेटवर्क 10000 पेक्षा जास्त हेक्टर आणि 11000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 'राष्ट्रीय फलोत्पादन मंडळा'चे या क्लस्टरला सहकार्य आहे.
प्राइम फ्रेश लिमिटेडचे संचालक हिरेन गेलाणी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला हा क्लस्टर विकास कार्यक्रम भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देणारा आहे. नाशिक क्लस्टरची जबाबदारी मिळणे हा प्राइम फ्रेशसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कोल्ड-चेन आणि थेट बाजारपेठ यांची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नासाडी रोखणे आणि भारतीय शेतीला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे, असेही त्यांनी म्हटले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.