भाकरीसोबत झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी, घरीच बनवा अशी
दुपारच्या जेवणात रोजची भाजी, आमटी नको वाटत असेल, तर राजस्थानी पद्धतीची लसूण-मिरची चटणी जेवणाची चव दुप्पट करते.
दुपारच्या जेवणात किंवा इतर वेळी भाजी, आमटी बनवण्याचा खूप कंटाळा येतो. रोज तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला की काहीतरी झणझणीत आणि टेस्टी खावेसे वाटते. अशा वेळी जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी राजस्थानी पद्धतीची लसूण-मिरची चटणी बनवता येते. ही चटणी चवीला अतिशय सुंदर लागते.
गरमागरम भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत ही लसूण चटणी छान लागते. खलबत्त्यात कुटून बनवलेल्या चटणीची चव खूपच भन्नाट असते. लसूण खायचा सगळेच खूप कंटाळा करतात. अशा वेळी वेगवेगळे पदार्थ वापरून केलेल्या चटण्या मुलांना खायला द्याव्यात. चला तर पाहूया, ही लसूण-मिरची चटणी कशी बनवायची.
या चटणीसाठी लसूण, लाल सुक्या मिरच्या, ताक, जिरं, मीठ, मोहरीचे तेल, आमचूर पावडर आणि कोथिंबीर एवढे साहित्य लागते. हे सगळे साहित्य आधी जवळ घेऊन ठेवावे, म्हणजे चटणी करताना धावपळ होत नाही.
सर्वात आधी लसणाच्या पाकळ्यांची साल काढून घ्या. चटणी करताना सालासकट पाकळ्या घालू नयेत. त्यानंतर गरम पाण्यात लाल काश्मिरी मिरच्या घाला आणि त्या एक तास ताकात भिजत ठेवा. ताकात भिजलेल्या मिरच्या मऊ होतात आणि मग त्या सहज कुटल्या जातात.
खलबत्त्यात भिजवलेल्या मिरच्या, जिरे आणि थोडे मीठ घालून चटणी बारीक कुटा. कुटण्याआधी हातांना तेल लावावे, म्हणजे हातांची जळजळ होणार नाही. मिरच्या कुटून झाल्या की त्यात लसूण घालून तोही कुटून घ्या.
आता कढईत मोहरीचे तेल गरम करा. त्यात जिरं आणि हिंग घालून भाजा. त्यानंतर तयार केलेली चटणी त्यात ओता आणि चमच्याने नीट मिक्स करा. चटणीतला ओलावा कमी होण्यासाठी ती मंद आचेवर भाजावी.
सगळ्यात शेवटी आमचूर पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळे व्यवस्थित मिक्स करा. चटणी थंड झाल्यावर काचेच्या डब्यात भरून ठेवा, म्हणजे ती नीट टिकून राहील. अशा प्रकारे राजस्थानी पद्धतीची लसूण-मिरची चटणी तयार आहे.