मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा चीज पराठा, आवडीने संपेल टिफिन
लहान मुलांच्या टिफिनसाठी सोपी आणि चटपटीत चीज पराठा रेसिपी.
लहान मुलं चीजपासून बनवलेले पदार्थ आवर्जून आवडीने खातात. डबा पूर्ण संपत नाही म्हणून घरातल्यांची कुरकुर होत असेल, तर या वेळी डब्यात चीज पराठा बनवून द्या. पारंपरिक पराठ्याला एक चविष्ट आणि मॉडर्न ट्विस्ट देणारा हा पदार्थ आहे. बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून वितळलेल्या चीजमुळे मऊ लागणारा हा पराठा नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळी हलकी भूक लागल्यावर खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. गव्हाच्या पिठाची पोळी लाटून त्यात भरपूर चीज, मसाले आणि भाज्या भरल्या की पराठ्याची चव आणखी छान लागते.
हा पराठा बनवायला फार वेळ लागत नाही आणि घरातल्या उपलब्ध साहित्यातून सहज तयार होतो. चीजसोबत थोडी हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा किंवा ओरेगानो घातलं की पराठ्याला छान वास आणि चव येते. चीज वितळून पराठ्याच्या प्रत्येक घासात मिसळतं, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडतो. चला तर मग रेसिपी बघूयात.
यासाठी लागणारं साहित्य असं आहे - 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप किसलेलं चीज, 1 छोटा कांदा बारीक चिरलेला, 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओरेगानो किंवा मिक्स हर्ब्स, पाव चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, गरजेनुसार पाणी आणि पराठा भाजण्यासाठी तूप किंवा तेल.
कृती करताना आधी एका परातीत गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडं मीठ आणि एक चमचा तेल घाला. पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्या आणि झाकून 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात किसलेलं चीज, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्या. त्यात लाल तिखट, जिरेपूड, ओरेगानो किंवा मिक्स हर्ब्स आणि थोडं मीठ घालून सगळं नीट मिसळा. चीज आधीच खारट असल्यामुळे मीठ कमीच वापरा.
त्यानंतर मळलेल्या पिठाचे सारखे गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन त्याला थोडं पीठ लावून छोटी पोळी लाटा. पोळीच्या मध्यभागी चीजचं सारण ठेवा आणि पोळीच्या कडा एकत्र आणून सारण पूर्णपणे बंद करा. हलक्या हाताने दाबून पुन्हा गोल किंवा चौकोनी आकाराचा पराठा लाटा. तवा गरम करून त्यावर पराठा टाका. एका बाजूला हलके डाग दिसू लागले की पराठा उलटा आणि दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा. याच पद्धतीने बाकीचे पराठेही बनवून घ्या. गरमागरम चीज पराठा हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.